राजेश देशपांडे,लेखक-दिग्दर्शक

माझे बालपण व दहावीपर्यंतचे शिक्षण कोकणात राजापूर तालुक्यातील येळवण गावी झाले. गावात तेव्हा वर्तमानपत्रही आठ दिवसांनी येत होते. त्यामुळे पुस्तकांची मोठी दुकाने असणे आणि दुकानात जाऊन पुस्तके विकत घेणे तर लांबची गोष्ट होती. पण आमच्या विद्यानिकेतन येळवण हायस्कूलच्या ग्रंथालयात असलेल्या पुस्तकांमुळे वाचनाची गोडी लागली. अर्थात त्यामुळे ज्या वयात ‘किशोर’, ‘चांदोबा’ अशी मासिके किंवा लहान मुलांची पुस्तके वाचायची तेव्हा मी जयवंत दळवी, जी.ए. कुलकर्णी, बाबूराव अर्नाळकर असे लेखक वाचून काढले. पु. ल. देशपांडे यांचीही पुस्तके वाचली. नाटकांच्या पुस्तकांचेही वाचन केले.  आई आणि वडिलांमुळे वाचनाचा संस्कार माझ्यावर झाला.

दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी मुंबईत आलो. अंधेरी येथील ‘एमव्हीयूएल’ हे माझे महाविद्यालय.  महाविद्यालयीन काळात व त्या वयात जे समोर येईल ते वाचत गेलो. तेव्हा विशेष करून कविता वाचायची आवड निर्माण झाली. त्या वयात कविताही करायला लागलो.  महाविद्यालयीन जीवनाच्या काळात नाटकांच्या काही चमूंशी जोडला गेलो. त्यामुळे नाटकांच्या पुस्तकांचे वाचन जास्त प्रमाणात झाले. त्या विशिष्ट वयात आपण एखाद्या गोष्टीने खूप भारावून जातो. त्यातून बाहेर पडतोच असे नाही. चार्ली चॅप्लिनच्या आत्मचरित्राचा ‘हसरे दु:ख’ हा मराठी अनुवादही त्या काळात वाचला. अनंत सामंत यांचे ‘एमटी आयवा अथवा मारु’, चंद्रशेखर गोखले यांचा ‘मी माझा’आणि इतरही अनेक पुस्तके वाचली. वेगवेगळ्या व्यक्तींच्या आत्मचरित्रांचेही वाचन केले. आपले स्वत:चे स्वतंत्र स्थान निर्माण केलेल्या या मंडळींच्या आयुष्याचा पट आत्मचरित्रांमधून वाचायला मिळाला. या वाचनातून त्यांचा संघर्ष, जिद्द आणि ध्येयाकडे केलेली वाटचाल समजली आणि आत्मचरित्रात्मक पुस्तके वाचून प्रेरणाही मिळाली.

ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी अनुवादित केलेले अभिनेते नसिरुद्दीन शहा यांचे आत्मचरित्र सध्या वाचत आहे. आता मालिकांचे चित्रीकरण आणि अन्य व्यापामुळे वाचन काही प्रमाणात कमी झाले असले तरी या सगळ्यातून जसा वेळ मिळेल तेव्हा वाचन करतोच करतो. मानसशास्त्र’, ‘इतिहास’ अशा विषयांवरील पुस्तकांचेही वाचन करतो  आहे. त्याच्या जोडीला आत्मचरित्रांचे वाचनही आहे. अमुकच लेखक वाचतोय असे नाही. नवे, जुने असे सगळे लेखक जमेल तसा वाचायचा माझा प्रयत्न असतो. ‘लोकसत्ता’च्या ‘चतुरंग’ व ‘लोकरंग’ या पुरवण्यांमधील ‘साहित्य’ही वाचनीय असते. त्या पुरवण्याही जपून ठेवतो. वेळ मिळेल तेव्हा त्यांचेही वाचन होत असते.

पु. ल. देशपांडे म्हणजे आयुष्यभर निखळ आनंद आणि सकारात्मकता देणारा ‘देवदूत’ आहे. ते एक प्रकारे मानसोपचारतज्ज्ञही आहेत. जेव्हा कधी मन अस्वस्थ होते, मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा मी ‘पुलं’ची पुस्तके पुन्हा पुन्हा वाचतो. आता तर ‘यू टय़ूब’वरही त्यांचे कथाकथन पाहायला मिळते. तेही पाहतो. एकूणच आजवरच्या आयुष्यात पुस्तक वाचनातून खूप आनंद आणि प्रेरणा मिळाली. ‘दिसामाजी काहीतरी लिहावे आणि वाचावे’ या तत्त्वानुसार जमेल तसे दोन्ही करत असतो.

‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘व्हॉट्स अ‍ॅप’ यांसारखी सामाजिक माध्यमे, स्मार्टफोन, माहितीचे महाजाल, संगणक यामुळे आत्ताच्या पिढीचे वाचन काही प्रमाणात कमी झाले आहे ही गोष्ट खरी आहे. ही माध्यमे वापरणे चुकीचेही नाही. पण त्याचा किती वापर करायचा, त्याच्या किती आहारी जायचे याचा सारासार विचार मुलांनी आणि पालकांनीही केला पाहिजे. या सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आत्ताच्या पिढीला ‘माहिती’ खूप मिळते पण ‘माहिती’ आणि ‘ज्ञान’ यात खूप फरक आहे. मिळालेल्या माहितीचे ज्ञानात रूपांतर झाले पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष अनुभव मिळविण्याची खरी गरज आहे. हा अनुभव त्यांना स्वत:लाच घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आयत्या मिळणाऱ्या या  माहितीवर केवळ अवलंबून न राहता त्या विषयाचे सखोल व परिपूर्ण ज्ञान कसे मिळेल हे आत्ताच्या पिढीने पाहावे. ही सामाजिक माध्यमे, स्मार्टफोन याचे नावीन्य आणखी काही वर्षांनी इतक्या प्रमाणात राहणार नाही, असे वाटते.

आता लेखक-दिग्दर्शक म्हणून काम करत असलो तरी सुरुवातीचा काही काळ मी व्यावसायिक नाटकांमधून अभिनय केला. नाटकांच्या दौऱ्याच्या निमित्ताने गावोगावी जाणे झाले. महाराष्ट्रात दर दहा कोसांवर भाषा बदलते. त्यामुळे मराठी भाषेची वेगवेगळी रूपे आणि माणसे अनुभवता आणि वाचताही आली. प्रेक्षकांची नाडी त्यामुळे सापडली.

पु. ल. देशपांडे यांना आदर्श मानून त्यांच्यासारखे लेखन करण्याचा माझा प्रयत्न असतो. लहानपणापासून वाचायची सवय आणि गोडी लागल्यामुळे माझे अनुभवविश्व आणि विचार समृद्ध झाले. पुढे लेखनासाठीही त्याचा खूप फायदा झाला. नाटकांच्या पुस्तकांच्या वाचनाचा पुढे मी करत असलेल्या लेखनाची बांधणी आणि संवाद लेखन यासाठीही मोलाचा उपयोग झाला.