आरोपपत्रास एक दिवसाचा विलंब केल्याने वाधवान बंधूंना जामीन

मुंबई : येस बँक गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी आणि ‘दिवाण हौसिंग फिनान्स लिमिटेड’चे कपिल आणि धीरज वाधवान यांच्याविरोधात एक दिवस उशिरा आरोपपत्र दाखल करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने या दोघांना गुरुवारी सशर्त जामीन मंजूर केला.

असे असले तरी या प्रकरणाची सीबीआयतर्फेही चौकशी सुरू असल्याने कपिल आणि धीरज यांना कारागृहातच राहावे लागणार आहे.

कायद्यानुसार आरोपपत्र ६० दिवसांच्या आत दाखल करणे अनिवार्य आहे. ते या कालावधीत दाखल केले गेले नाही, तर आरोपी त्याचाच आधार घेऊन जामिनाची मागणी करतात. वाधवान बंधुंनीही याच आधारे जामिनाची मागणी केली होती. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) निर्धारित कालावधीच्या एक दिवस उशिरा म्हणजेच ६० दिवस पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी आरोपपत्र दाखल केले. त्यामुळे कायद्याचा विचार करता आरोपीला एकही दिवस कारागृहात ठेवता येऊ शकणार नाही व ते जामिनास पात्र आहेत, असेही न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी वाधवान बंधुंना जामीन मंजूर करताना स्पष्ट केले.

तर न्यायालयाने ज्या मुद्यावर वाधवान बंधुंना जामीन मंजूर केला आहे, त्या मुद्यावर विविध न्यायालयांनी वेगवेगळे मत व्यक्त केले आहे. त्यामुळेच हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर न्यायचा असल्याचे ‘ईडी’तर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच जामिनाच्या आदेशाला दोन आठवडय़ांची स्थगिती देण्याची मागणी केली.

न्यायालयाने त्यांचा हा युक्तिवाद अमान्य केला. एवढेच नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच याबाबत दिलेल्या निकालाचाही न्यायालयाने दाखला दिला. आरोपपत्र दाखल करण्याचा कालावधी कोणतेही न्यायालय वाढवून देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने या निकालात म्हटले होते. त्यामुळे वाधवान बंधुही जामिनास पात्र असल्याचे न्यायालयाने नमूद केले.

प्रकरण काय? : येस बँकेचा निमंत्रक राणा कपूर आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात सीबीआयने ७ मार्चला गुन्हा दाखल केला होता. त्या पार्श्वभूमीवर ‘ईडी’नेही कपिल आणि धीरज यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. दोघांवर कट रचणे, त्यानुसार फसवणूक करण्याच्या आरोपासह लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल आहे.