प्रजासत्ताक दिनाच्या पाश्र्वभूमीवर इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया म्हणजेच आयसिसकडून घातपाती कारवाया केल्या जाण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने प्रसारित केल्यानंतर सतर्क झालेल्या राज्याच्या दहशतवादविरोधी विभागाने अशा युवकांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली आहे.
अशा युवकांना सरसकट अटक करण्याऐवजी त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे. गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीवरून मुंब््रयातून अटक केलेला संशयित आयसिस दहशतवादी हा सीरियातील प्रमुख म्होरक्यांच्या संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती मिळाली आहे. त्याची अधिक चौकशी करून राज्यात काही घातपाती कारवाया केल्या जाण्याची शक्यता होती का, याची चौकशी केली जात आहे. गुप्तचर यंत्रणेने दिलेला अहवाल तसेच राज्य एटीएसच्या विभागीय पातळीवरील यंत्रणेच्या तपासावरून किमान डझनभर युवक रडारवर आहेत.
या युवकांना आयसिसमध्ये सामील होण्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याशिवाय आयसिसच्या प्रभावामुळे राज्यातील किती युवक प्रत्यक्षात सीरियामध्ये गेले याची माहिती काढली जात असल्याचे राज्य दहशतवादविरोधी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सीरियातील आयसिसच्या मुख्य म्होरक्याच्या संपर्कात असलेल्या व मुंब््रयात पकडला गेलेल्या मुदस्सर मुश्ताक शेख याच्याबाबत गुप्तचर यंत्रणेने माहिती दिल्यानंतर गेले काही दिवस एटीएसचे अधिकारी पाळतीवर होते, असेही सांगण्यात आले. आयसिसमध्ये सामील होण्यापासून या युवकांना परावृत्त करण्यासाठी एटीएसचे सर्व युनिट सक्रिय आहेत. पुण्यात एका शाळकरी मुलीला परावृत्त करण्यात यशस्वी झाल्यानंतर मालवणीतील चारपैकी तीन युवकांना पुन्हा घरी परत येण्यास भाग पाडण्यात एटीएस यशस्वी झाले होते. आताही डझनभर युवक रडारवर असून ते आयसिसमध्ये सामील होण्यासाठी सज्ज असल्याची गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे.
या युवकांना ताब्यात घेण्यासाठी एटीएसने प्रयत्न सुरू केले आहेत. कल्याणमधून चार युवक गायब होऊन ते आयसिसमध्ये सामील होण्यासाठी गेल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर एटीएसची यंत्रणा अधिक सतर्क झाली. याबाबत अधिकृतपणे माहिती सांगण्यास नकार देण्यात आला. ‘आयसिस’चा धोका निर्माण झाल्यानंतर लगेचच एटीएसने अशा युवकांना हेरून काढण्यासाठी कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली होती.