उरण-पनवेल राज्य महामार्ग क्रमांक ५४ वरील जासई येथे रविवारी मोटार सायकलवरून जाणाऱ्या श्रीकांत भरत म्हात्रे या तरुणाला कंटेनरवाहक ट्रेलरने धडक दिल्याने या अपघात तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जासई ग्रामस्थांना उरण पनवेल रस्त्यावर रास्ता रोको करून मृत तरुणाला नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. अवजड वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी लहान वाहनांसाठीची सव्‍‌र्हिस रोडची मागणी पुन्हा एकदा ऐरणीवर आलेली आहे.
उरण पनवेल रस्त्यावरून धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी वाहनचालकांचे अपघात झाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. उरण पनवेल रस्त्यालगत असलेल्या कंटेनर गोदामात ये-जा करण्यासाठी अवजड व अधिक लांबीची वाहने रस्त्यावरून बेदराकरपणे चालत असल्याने दुचाकी वाहनचालकांना आपले प्राण गमवावे लागल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अपघातग्रस्त तरुणाला नुकसानभरपाई मिळावी यासाठी भरपावसात तीन तास रास्ता रोको केला होता. या वेळी पोलिसांनी मध्यस्थी करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.