टीव्ही वाहिन्यांवरील लोकप्रिय मालिकांच्या दैनंदिन भागांचे व्हिडीओ आणि गाजलेल्या चित्रपटातील प्रसंगांचे व्हिडीओ ऑनलाइन उपलब्ध करून देण्याइतपतच गुगलच्या युटय़ूबची मर्यादित भूमिका होती. पण, गेल्या काही वर्षांत इंटरनेट वापरणाऱ्या आणि त्यातही यूटय़ूबवर व्हिडीओ पाहणाऱ्यांचे वाढलेले प्रमाण लक्षात घेऊन यूटय़ूबने भारतीय प्रेक्षकांसाठी स्वत:चे ऑनलाइन शो उपलब्ध करून दिले आहेत. यूटय़ूबने ‘कॉमेडी वीक’ हा ऑनलाइन शो उपलब्ध करून दिला असून त्याच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेत विस्तार करण्यास सुरुवात के ली असल्याचे ‘गुगल इंडिया’चे विपणन संचालक संदीप मेनन यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.
भारतात दर तीन माणसांमागे एकजण या वेगाने यूटय़ूबवर व्हिडिओ बघणाऱ्यांची संख्या वाढते आहे. यातले चाळीस टक्के लोक हे मोबाईलवरच यूटय़ूबचे व्हिडीओ बघतात. पुढच्या दोन वर्षांत हाच आकडा दुपटीने वाढणार आहे. त्यामुळे इथे जास्तीत जास्त लोकांना यूटय़ूबपर्यंत आणायचे असेल तर त्यांच्या आवडीच्या विषयावरचे व्हिडीओ दाखवायला हवेत, असा सगळा विचार करूनच ‘यूटय़ूब कॉमेडी वीक’ची सुरुवात केल्याचे मेनन यांनी सांगितले.
‘यूटय़ूब कॉमेडी वीक’अंतर्गत सायरस भरुचा, वीर दास, भारती, कृष्णा, व्हीआयपी, सौरभ पंत आणि सुगंधा अशा प्रसिद्ध विनोदवीरांचे शो पाहता येणार आहेत. याशिवाय, एमटीव्ही बकरा, देख भाई देख, कॉमेडी सर्कस, कपिल शर्मा की कॉमेडी नाईट्स अशा गाजलेल्या मालिकांमधले काही भागांचे व्हिडीओ असा संपूर्ण ४०० तासांची विनोदी कार्यक्रम पाहता येईल. यात पूर्णपणे नवीन अशा ३५ कार्यक्रमांचाही समावेश असल्याची माहिती मेनन यांनी दिली. भविष्यात टीव्हीच्या तोडीचे ऑनलाइन चॅनेलविश्व उभे राहील. त्यात गुगल यूटय़ूबचा सिंहाचा वाटा असेल. हा शो म्हणजे भविष्याच्या दृष्टीने उचललेले पहिले पाऊल असल्याचे मेनन यांनी नमूद केले.

यूटय़ूबकडे जाहिरातदारांचाही ओढा वाढला..यूटय़ूबवर गेल्या दोन वर्षांत मोठमोठय़ा कंपन्यांनी जाहिराती देण्यास सुरुवात केली आहे. दररोज यूटय़ूब पाहणाऱ्यांमध्ये २० ते ४० वयोगटातील लोकांचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यामुळे या लोकांना विविध उत्पादनांसाठी ऑनलाइन माध्यमातून आकर्षित करण्याची संधी जाहिरातदारांना मिळते. त्याचबरोबर जाहिरातदारांना इथे प्रत्येक जाहिरातीसाठी पैसे मोजावे लागत नाहीत. तुमची जाहिरात अपलोड झाल्यानंतर जितके लोक ती पाहतील त्याप्रमाणे जाहिरातीसाठी पैसे मोजावे लागतात. ऑनलाइन जाहिरात अपलोड करण्याची यंत्रणाही सोपी, सुटसुटीत असल्यामुळे अगदी वैयक्तिक सामानाची विक्री करणाऱ्यांपासून ते मोठमोठय़ा कंपन्यांच्या जाहिरातदारांना यूटय़ूबवर सहज जाहिराती अपलोड करता येतात. त्यामुळे यूटय़ूबकडे जाहिरातदारांचा ओघ वाढल्याचे मेनन यांनी स्पष्ट केले.