राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून शिवसेना भाजपानं बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपाला १०५, शिवसेनेला ५६ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ५४, काँग्रेसला ४४ जागांवर विजय मिळाला आहे. या निवडणुकीत सर्वांच लक्ष लागून राहिलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अॅड. सुरेश माने यांना ६७ हजार ४२७ पेक्षा अधिक मतांनी पराभव केला. ठाकरे कुटुंबातील निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे ते पहिलेच सदस्य आहेत. त्यांच्या विजयानंतर वरळी परिसरात आता Young soch wins अशा आशयाचे पोस्टर्स लागल्याचं पहायला मिळत आहे.

यापूर्वी वरळी परिसरात आदित्य ठाकरे हे भावी मुख्यमंत्री आहेत असे बॅनर्स लावण्यात आले होते. “शिवसेना युवा नेते भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे यांचे वरळी विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतानी विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन,” अशा आशयाचे बॅनर्स वरळीत लावले होते.. ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं अनेक जण त्यांच्या प्रचारासाठी रिंगणात उतरले होते. त्यामुळे अनेकांचं लक्ष या ठिकाणच्या निवडणुकीकडे लागले होते. वरळीचे आमदार सुनील शिंदे, राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले सचिन अहिर, विभागप्रमुख आशिष चेंबूरकर यांनी आदित्य ठाकरेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्या बॅनर्सनंतर आता Young soch wins: (युवा विचारांचा विजय) असे बॅनर्स शिवसेनेकडून लावण्यात आले आहेत.

शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाद्वारे हे बॅनर्स लावण्यात आले आहेत. तसंच यावर आदित्य ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला असून फोटाच्या बाजूला Young soch wins असं लिहिण्यात आलं आहे.