झोपडय़ांच्या संख्येत मनमानी वाढ करून वाढीव चटईक्षेत्रफळाचा लाभ मिळवून घोटाळा करणाऱ्या विकासकांना आता चाप बसणार आहे. पात्र झोपुवासीयांची माहिती प्राधिकरणाने ऑनलाइन उपलब्ध करून दिल्याने अशी वाढ करणे अशक्य होणार आहे. जितके पात्र झोपडीवासीय तेवढेच चटईक्षेत्रफळ विकासकांना मिळणार आहे. त्यामुळे यापुढे झोपु योजनांमध्ये होणारा घोटाळा टळू शकेल आणि योजनाही तातडीने मार्गी लागतील, असा विश्वास झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केला आहे.
आतापर्यंत जितक्या झोपडय़ा तितके चटईक्षेत्रफळ आणि त्यावर लाभांश विकासकांना मिळत होता. त्यामुळे झोपडय़ांची संख्या वाढविण्यावर विकासकाचा भर होता. आता मात्र झोपुवासीयांची पात्रता ऑनलाइन करण्यात आल्याने बोगस कागदपत्रे सादर करून पात्रता निश्चित करणे कठीण होणार आहे. .
या अधिसूचनेनुसार यापुढे झोपुवासीयांची पात्रता अधिक काटेकोर आणि पारदर्शक पद्धतीने तपासली जाणार आहे. पात्र झोपुवासीयांना ओळखपत्र दिल्यानंतर ही सर्व माहिती ‘डेटाबेस’ म्हणून साठविली जाणार आहे. इतकेच नव्हे तर संबंधित झोपडीचे उपग्रह नकाशेही काढले जाणार आहेत. या प्रकरणात पात्रता निश्चित करणाऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडून सादर केलेल्या कागदपत्रांचे स्कॅनिंग करून तो कायमस्वरुपी अभिलेख म्हणून जतन करण्यात येणार आहे. मुंबईतील झोपु प्राधिकरणाला नव्याने संगणक आज्ञावलीही तयार करण्याचे आदेश देण्यात
आले आहेत.