विक्रोळीतील दुर्घटना; चौघांची प्रकृती चिंताजनक
कुर्ला येथील ‘सिटी किनारा’ हॉटेलमध्ये आग लागून आठ जण मृत्युमुखी पडल्याची दुर्घटना ताजी असतानाच शनिवारी विक्रोळीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यात चार महिलांसह दहा जण जखमी झाले. यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे.
विक्रोळी (प.) येथील पार्कसाइट परिसरातील आंबेडकर नगरमधील क्रांती चाळीतील एका घरामध्ये दुपारी साडेअकराच्या सुमारास गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आणि त्यात एकमजली इमारत उद्ध्वस्त झाली. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे तीन बंब, दोन रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या.
स्फोटानंतर घटनास्थळी आग लागली. ही आग आजूबाजूच्या परिसरात पसरण्याआधी अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठय़ा शर्थीने ती आटोक्यात आणली. या दुर्घटनेत दहा जण जखमी झाले असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे.
जखमींमध्ये संतोष शिंदे (३१), अनिकेत चव्हाण (१७), सपना चव्हाण (१३), विमल चव्हाण (५०), सौरभ चव्हाण (१७), देवगण सिंह (४०), राहुल दानवले (२२), सुमन दानवले (४५), विजय विष्णू सावंत (४१), मीराबाई माने (६५) यांचा समावेश आहे. सर्व जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

असा झाला स्फोट
क्रांती चाळीत राहणाऱ्या विमल चव्हाण यांच्या घरातील गॅस सिलिंडर संपला होता. त्यामुळे त्यांनी समोरच राहणाऱ्या रेश्मा शिंदे यांच्या घरातील गॅस सिलिंडर घेतला आणि तो आपल्या घरातील शेगडीला जोडत होत्या. त्याच वेळी गॅस गळती झाली आणि सिलिंडरचा स्फोट झाला.

हॉटेलांची तपासणी
‘सिटी किनारा’ हॉटेल दुर्घटनेची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त अजय मेहता यांनी श्रेणी एक, दोन आणि तीनमधील हॉटेलची कसून तपासणीचे आदेश अग्निशमन दल आणि आरोग्य विभागाला दिले आहेत. रोज प्रत्येक विभाग कार्यालयाच्या हद्दीतील दहा हॉटेलची तपासणी होईल. शहरातील २४० हॉटेल्सची रोज तपासणी होणार आहे. ‘सिटी किनारा’चा परवाना रद्द करण्यात आला असून दुर्घटनेची चौकशी करून १५ दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले.