मुंबई: एका बाजूला संपूर्ण मुंबईत पाणी कपात लागू करायची की नाही यावर प्रशासकीय पातळीवर अद्याप खल सुरू असतानाच पिसे येथील उदंचन केंद्रात सोमवारी लागलेल्या आगीमुळे संपूर्ण मुंबईत सक्तीने १५ टक्के पाणी कपात करावी लागणार आहे. पिसे उदंचन केंद्रातील एक ट्रान्सफॉर्मर पूर्ण जळाल्यामुळे काही पंप बंद ठेवावे लागणारे आहेत. हा ट्रान्सफॉर्मर दुरुस्त होण्यास ५ मार्चपर्यंत वेळ लागणार असल्यामुळे तोपर्यंत संपूर्ण मुंबईत १५ टक्के पाणी कपात केली जाणार आहे. संपूर्ण मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे तसेच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यांतून होणा-या पाणीपुरवठ्यामध्ये मंगळवारी मध्यरात्रीपासून १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणातील पाणीसाठा खालावल्यामुळे संपूर्ण मुंबईत दहा टक्के पाणी कपात करण्याबाबत पालिका प्रशासन विचार करीत आहे. मात्र त्यातच सोमवारी पिसे येथी उदंचन केंद्रात संध्याकाळी सातच्या सुमारास आग लागल्यामुळे पाणी कपातीची वेळ आली आहे. पिसे जल उदंचन केंद्रातील ट्रान्सफॉर्मरला लागलेली आग रात्री दहाच्या सुमारास विझल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पालिकेच्या यंत्रणेने ताबडतोब दुरुस्तीकाम हाती घेतले. उदंचन केंद्रातील यंत्रणा हळूहळू पूर्वपदावर येत असून सद्यस्थितीत २० पैकी १५ पंप सुरू करण्यात पालिकेच्या यंत्रणेला यश आले आहे.

हेही वाचा >>>तस्कर अली असगर शिराजी प्रकरण: अब्दू रोझिक ईडी कार्यालयात दाखल

पिसे येथे लागलेल्या आगीमुळे शहर आणि पूर्व उपनगरात १०० टक्के पाणी पुरवठा बंद राहील असा इशारा पालिका प्रशासनाने दिला होता. मात्र सोमवारी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास एक ट्रान्सफार्मर सुरू करून त्यावर हळूहळू आठ पंप सुरू करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी पहाटे चार वाजल्यापासून पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील सुमारे आठ पंप सुरू करण्यात आले. सकाळी नऊ वाजल्यापासून पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील गोलंजी, रावळी, फॉसबेरी व भंडारवाडा सेवा जलाशयातून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर सकाळी ११ वाजता दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून तो देखील सुरू करण्यात आला व त्यावर पिसे उदंचन केंद्रातील इतर सहा पंप हळूहळू सुरू करण्यात आले. त्यामुळे पूर्व उपनगरात ५० टक्के पाणी पुरवठा सुरू करण्यात आला तर दुपारी नंतर सुमारे ७० टक्के पाणी पुरवठा करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मात्र पिसे येथील चार ट्रान्सफार्मरपैकी एक ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाल्यामुळे तो सुरू होण्यास ५ मार्चपर्यंतचा वेळ लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण मुंबईत बुधवारपासून १५ टक्के पाणी कपात करावी लागणार असल्याची माहिती जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली.