संदीप आचार्य
मुंबई : लखनौहून मुंबईला येताना राजहंस सिंग यांच्या मनात धाकधूक होती. महाराष्ट्रात करोना वेगाने वाढत असताना आपल्या मुलाची कर्करोग शस्त्रक्रिया होईल की नाही ही चिंता होती. मात्र परळच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कोणतीही दिरंगाई न होता त्यांच्या मुलाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली… करोना काळातही टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कर्करुग्णांची योग्य काळजी घेतली जात असून आता उपचारांचा वेगही रुग्णालयाने वाढवला आहे.

टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा मोठ्या संख्येने देशभरातून कॅन्सर रुग्ण उपचारासाठी येऊ लागले आहेत. प्रामुख्याने पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश आदी राज्यातून रोज नव्याने रुग्ण उपचारासाठी येत आहेत. मे ते ऑगस्ट या चार महिन्यात तब्बल सहा हजार नवे रुग्ण उपचारासाठी टाटा हॉस्पिटलमध्ये आले. याचाच अर्थ दरमहा दीड हजार रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. प्रामुख्याने टाटा कॅन्सर रुग्णालयाचा नवीन रुग्णांवरच उपचार करण्यावर भर आहे. केमोथेरपी व रेडिएशन ची आवश्यकता असलेल्या जुन्या रुग्णांना स्थानिक पातळीवरील रुग्णालयात उपचारासाठी संदर्भात केले जात असून त्यासाठी आवश्यक असलेली सर्व मदत व मार्गदर्शन टाटा रुग्णालयातील डॉक्टरांकडून केले जात आहे.

करोनाच्या पहिल्या महिन्यापासूनच देशभरातीलच नव्हे तर जगभरातील रुग्णालयांतून सामान्य रुग्णांवर उपचार करणे जवळपास बंद झाले होते. महाराष्ट्रात केवळ खासगीच नव्हे तर सरकारी व महापालिका रुग्णालयांतही अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता अन्य शस्त्रक्रिया बंद करण्यात आल्या होत्या. आता हळूहळू सामान्य रुग्ण तपासणी व शस्त्रक्रिया वाढू लागल्या असल्या तरी आजही त्या पुरेशा वेगाने होताना दिसत नाही. “सामान्य रुग्णांचे जर करोना काळात एवढे हाल तर कर्करोग रुग्णांची काय अवस्था असेल याचा विचार करा” असे टाटा कॅन्सरच्या शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख व उपसंचालक डॉ. शैलेश श्रीखंडे म्हणाले. देशभरात वेगवेगळ्या कॅन्सर रुग्णालयात कर्करुग्णांवर उपचार सुरु व्हावे यासाठी डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी २३ मार्च ते ३० एप्रिल या काळात टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ३७ दिवसात ४९४ शस्त्रक्रिया केल्या. या अनुभवावर आधारित हार्वर्डच्या ‘अॅनल्स ऑफ सर्जरी’ या जर्नलमध्ये डॉ श्रीखंडे यांचा शोधनिबंधही प्रसिद्ध झाला.

या दरम्यान महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या अनेक कर्करोग रुग्णांनाही करोना होता. करोना आणि कर्करोग असा दुहेरी सामना टाटा मधील डॉक्टर करत होते. सुरुवातीला रुग्ण दाखल करण्याचा वेग कमी असला तरी टाटा हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजन बडवे व अन्य प्रमुख डॉक्टरांनी कर्करुग्णांवरील उपचाराचा वेग वाढविण्याचा निर्णय घेतला. दर महिन्याला तीस टक्के वेगाने रुग्णोपचार वाढविण्यास सुरुवात केली.

टाटा कॅन्सर हॉस्पिटल मध्ये एरवी वर्षाकाठी ७५ हजार कर्करोग रुग्णांवर उपचारांसाठी येतात. ६४० बेड असलेल्या या रुग्णालयात एकूण ३००० कर्मचारी आहेत. यात २००० डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आदी असून १००० लोक प्रशासकीय काम पाहातात. करोनाच्या सुरुवातीपासून आपल्या कर्मचाऱ्यांनीही लागण होऊ शकते हे लक्षात घेऊन रोटेशन पद्धतीने डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या कामाचे व्यवस्थापन केले गेले.

अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता सुरुवातीला अन्य कॅन्सर शस्त्रक्रिया असतील किंवा केमोथेरपी वा रेडिएशनच्या रुग्णांवरील उपचार पुढे ढकलण्यात आले. मे महिन्यापासून कर्करुग्णांवरील उपचारांचा वेग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. “सुरुवातीला रोज ९५ रुग्णांवर रेडिएशन उपचार केले जात होते. ते वाढून आता रोज २९५ कर्करुग्णांवर रेडिएशन उपचार केले जात आहेत. करोनापूर्वकाळात ही संख्या रोज ३५० ते ४०० एवढी होती. साधारणपणे रोज ८२०० केमोथेरपी केल्या जातात करोनापूर्वी हे प्रमाण ९००० केमोथेरपी एवढे होते” असे डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे गेल्या चार महिन्यात म्हणजे मे ते ऑगस्ट या काळात एकूण १६०० कर्करुग्णांवर आम्ही शस्त्रक्रिया केल्याचे डॉ. श्रीखंडे म्हणाले. साधारणपणे दरमहा ४०० शस्त्रक्रिया हे प्रमाण असून यात अनेक करोना रुग्णांचा समावेश आहे. करोना रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग व त्याबाहेर स्वतंत्रपणे बेडची तसेच कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी लागत आहे. यासाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असल्यानेच आम्ही सावधपणे कर्करोग रुग्णांवरील उपचाराचे प्रमाण वाढवत आहोत. दरमहा ३० टक्के वाढ या रुग्णोपचारात आम्ही केली आहे. सप्टेंबरपासून रुग्णोपचारात ५० टक्के वाढ केली जाईल, असेही डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी सांगितले.

करोनाच्या काळात जास्तीत जास्त गरीब रुग्णांना अधिकाधिक उपचार मिळावे अशी रचना संचालक डॉ. राजन बडवे व त्यांच्या टीमने केली. सामान्यपणे टाटा हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांचे व पैसे देऊन उपचार घेणाऱ्यांची व्यवस्था ६० टक्के व ४० टक्के अशी असते. तथापि करोना काळातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन ८० टक्के गरीब रुग्ण व २० टक्के पैसे देऊन उपचार घेणारे रुग्ण अशी रचना करण्यात आली आहे. परिणामी जास्तीत जास्त गरीब कर्करोग रुग्णांवर टाटा हॉस्पिटलमध्ये आज उपचार केले जात असून आगामी काळात कर्करोग रुग्णांवरील उपचाराचा वेग आणखी वाढविण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी सांगितले.