scorecardresearch

मुंबई : अग्निशमन दलातील ९१० जागांसाठी आतापर्यंत २० हजार उमेदवार

इतर मागासवर्गासाठीच्या जागांची भरती प्रक्रिया तीन दिवस चालणार आहे तर खुल्या गटाच्या जागांसाठीची भरती प्रक्रिया चार दिवस चालणार आहे.

मुंबई : अग्निशमन दलातील ९१० जागांसाठी आतापर्यंत २० हजार उमेदवार
अग्निशमन दल (संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून रखडलेली मुंबई अग्निशमन दलातील भरती प्रक्रिया सुरू होऊन नऊ दिवस झाले असून गेल्या नऊ दिवसात तब्बल २० हजारापर्यंत उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी हजेरी लावली आहे. इतर मागासवर्गासाठीच्या जागांची भरती प्रक्रिया तीन दिवस चालणार आहे तर खुल्या गटाच्या जागांसाठीची भरती प्रक्रिया चार दिवस चालणार आहे.

अग्निशामक या पदाच्या तब्बल ९१० जागांसाठीची भरती प्रक्रिया १३ जानेवारीपासून सुरू झाली. दहिसर येथील भावदेवी मैदानात सरळसेवेने (वॉक इन सिलेक्शन) होणारी भरती ४ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. रविवारी सुट्टीमुळे व प्रजासत्ताक दिनी ही भरती प्रक्रिया होणार नाही. आतापर्यंत विशेष मागासवर्ग, अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जमाती या आरक्षित पदांसाठी भरती प्रक्रिया झाली आहे. सोमवारपासून इतर मागासवर्गासाठीच्या १७३ जागांसाठीची भरती प्रक्रिया सुरू झाली. या वर्गासाठीची भरती प्रक्रिया २७ जानेवारीपर्यंत चालणार आहे. त्यानंतर माजी सैनिक, अनाथ, खुला वर्ग, महिला या वर्गासाठीच्या भरती प्रक्रिया होणार आहे. खुला वर्गाच्या सर्वाधिक ४४३ जागा असून त्यासाठीची भरती प्रक्रिया चार दिवस चालणार आहे. खुल्या गटासाठी लाखभर उमेदवार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या नऊ दिवसात सुमारे २० हजारापर्यंत उमेदवार भरती प्रक्रियेसाठी आले होते अशी माहिती अग्निशमन दल प्रमुख संजय मांजरेकर यांनी दिली. यापैकी अनेक जण कागदपत्रे, वय, पात्रता या निकषांमुळे मैदानी चाचणीपूर्वीच बाद झाले. काही जण उंची, वजन या निकषांमध्ये बसत नव्हते. काही जण मैदानी चाचणीत नापास झाले.

ही भरती ४ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. उमेदवारांची धावणे, उंचावरून उडी मारणे, मानवकृती खांद्यावर घेऊन दिलेल्या मार्गाने धावणे, चढणे आणि उतरणे अशी मैदानी परीक्षा होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी झाल्यावर सहा महिने त्यांना अग्निशमन दलाचे प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यानंतर सेवेत रुजू केले जाणार आहे. यावेळी १२० गुणांची मैदानी चाचणी, ८० गुणांची प्रमाणपत्र चाचणी होणार आहे. यापूर्वी २०१७ मध्ये भरती झाली होती तशीच भरती आता होणार आहे. किमान ५० टक्के गुणांनी बारावी उत्तीर्ण इच्छुक उमेदवारांची पारंपरिक पद्धतीने शारीरिक तपासणी, वैद्यकीय तपासणी यांचा या प्रक्रियेत समावेश आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 21:08 IST

संबंधित बातम्या