कुख्यात गुंड छोटा राजन याचा कथिक हस्तक रामनारायण गुप्ता ऊर्फ लखनभैय्या याच्या बनावट चकमकीप्रकरणी दोषी ठरलेले निलंबित वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी आणि १२ पोलिसांसह २१ जणांना शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. बनावट चकमकीप्रकरणी पोलीस दोषी ठरून त्यांना शिक्षा होण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.
दोषी पोलिसांना फाशी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विद्या कासले यांनी केली होती. मात्र लखनभैय्यासारख्या गुंडाला यमसदनी पाठवून आम्ही काहीच चूक केली नसल्याचे वक्तव्य दोषी पोलिसांनी न्यायालयासमोर केले होते. या पाश्र्वभूमीवर या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. सकाळपासून आरोपींच्या कुटुंबियांनी न्यायालयाच्या परिसरात गर्दी केली होती. परंतु पावसाच्या संततधारेमुळे आरोपींना न्यायालयात उशीरा हजर करण्यात आले. परिणामी दुपारनंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. डी. जाधवार यांनी शिक्षा सुनावली. प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह तानाजी देसाई, रमाकांत कांबळे, विनायक शिंदे, नितीन सरतापे, देविदास सकपाळ, दिलीप पालांडे, प्रकाश कदम, गणेश हरपुले, आनंदा पाताडे, पांडुरग कोकम, संदीप सरदार, अरविंद सरवणकर या पोलिसांसह जनार्दन भांगे, शैलेन्द्र पांडे, हितेश सोलंकी, अकिल खान, मनोज मनुराज, सुनील सोलंकी, मोहम्मद मोइउद्दिन शेख व सुरेश शेट्टी या आरोपींना न्यायाधीशांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खुनाचा कट रचणे, एखाद्याला बेकायदा ताब्यात ठेवण्यास आणि त्याची हत्या करण्यास मदत करणे, बेकायदा जमाव करणे, खून करण्यासोबतच पुरावा नष्ट करणे आदी आरोप या सगळ्या आरोपींवर ठेवण्यात आले आहेत.
या आरोपींना शिक्षा सुनावली जाताना या प्रकरणातून निर्दोष सुटका झालेले ‘चकमकफेम’ अधिकारी प्रदीप शर्मा हेही न्यायालयात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रकरण काय?
११ नोव्हेंबर २००६ रोजी पोलिसांच्या एका पथकाने लखनभय्या आणि त्याचा साथीदार अनिल भेडा यांना वाशी येथून उचलले व वसरेवा येथील नाना-नानी पार्क जवळ नेऊन ठार केले. याप्रकरणी ‘चकमकफेम’ पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्यासह २१ जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. मात्र शर्मा यांची निदरेष मुक्तता करण्यात आली.

यांना शिक्षा..
प्रदीप सूर्यवंशी, तानाजी देसाई, रमाकांत कांबळे, विनायक शिंदे, नितीन सरतापे, देविदास सकपाळ, दिलीप पालांडे, प्रकाश कदम, गणेश हरपुले, आनंदा पाताडे, पांडुरग कोकम, संदीप सरदार, अरविंद सरवणकर, जनार्दन भांगे, शैलेन्द्र पांडे, हितेश सोलंकी, अकिल खान, मनोज मनुराज, सुनील सोलंकी, मोहम्मद मोइउद्दिन शेख व सुरेश शेट्टी

प्रदीप शर्मा यांची लवकरच जातमुचलक्यावर सुटका

निकालाच्या वेळी निर्दोष सुटका झालेले निलंबित ‘चकमकफेम’ अधिकारी प्रदीप शर्मा यांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. शर्मा यांची निर्दोष सुटका झाल्याने न्यायालयाने त्यांना १० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे अटकेपासून कारागृहात असलेल्या शर्मा यांची येत्या दोन-तीन दिवसांत सुटका होण्याची शक्यता आहे.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 21 including 13 cops get life for fake encounter of lakhan bhaiya
First published on: 13-07-2013 at 02:16 IST