‘मामी’ च्या ‘वर्ड टू स्क्रीन’ उपक्रमात २५० पुस्तकांचे सादरीकरण

मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या ‘इअर राऊंड प्रोग्राम’मध्ये ‘वर्ड टू स्क्रीन’ उपक्रमाच्या तिसऱ्या वर्षी देशभरातून २७ पुस्तक प्रकाशन संस्थांनी सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर ‘मामी’च्या परीक्षकांनी शिफारस केलेल्या ३६ पुस्तकांचा यामध्ये समावेश करण्यात आला. त्यामध्ये २५ पुस्तके कादंबरी आणि कथा अशा ललित साहित्य प्रकारातील होती तर ११ पुस्तके ललितेतर वाङ्मयातील होती.

देशभरातील प्रकाशकांनी मिळून १७४ पुस्तकांचे सादरीकरण मामीच्या या वर्ड टू स्क्रीन उपक्रमासाठी केले. त्यामुळे एकूण २५० च्या आसपास पुस्तके या उपक्रमात निर्मात्यांना शिफारस करण्यात आली. ही पुस्तके इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, मल्याळम, आसामी या भाषांमधील होती. त्यांची निवड करण्याचे कार्य अनु सिंग चौधरी, उर्मी जुवेकर, रेणुका शहाणे, अ‍ॅनी झैदी, अंबाई, मित्रा फुकान, अंबरीश सात्विक, जॉर्ज मथेन, सयेमा रेहान आणि मीरीएम जोसेफ या परीक्षकांनी केले.

२०१५ मध्ये लेखक – प्रकाशकांना चित्रपट, दूरचित्रवाणी आणि डिजिटल माध्यमांसाठी लेखन सादर करण्याची संधी मिळावी म्हणून ‘वर्ड टू स्क्रीन’ हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमासाठी अभिनेत्री सोनम कपूर ही फेस्टिव्हल चॅम्पियन असून अर्पिता दास या उपक्रमाच्या प्रमुख आहेत. या उपक्रमाअंतर्गत ‘ऑथर्स कॉर्नर’ या विभागात एम मुकुंदम, अनिता नायर, जेरी पिंटो, नमिता देवीदयाल, सैकत मुजुमदार, अमृता नारायणन, अमृता महाले आणि निखिल प्रधान यांनी आपली पुस्तके निर्मिती संस्थांसमोर सादर केली.

‘गेल्या तीन वर्षांत चांगले यश’

२०१६ आणि २०१७ मध्ये ‘वर्ड टू स्क्रीन’ या उपक्रमात एकूण २८९ पुस्तके सादर झाली होती. त्या तुलनेत या वर्षीच्या पुस्तकांची यादी मोठी होती. मोठय़ा प्रमाणात प्रकाशक आणि लेखकांनी उत्साहाने यात सहभाग घेतल्याचे ‘मामी’च्या या उपक्रमाच्या क्रिएटिव्ह दिग्र्दशक स्मृती किरण यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, या उपक्रमाला गेल्या तीन वर्षांत चांगले यश मिळाले असून यावर्षी सलग दोन दिवस देशभरातील लेखक- प्रकाशकांना मान्यवर निर्मिती संस्थांसमोर त्यांची पुस्तके सादर करण्याची संधी मिळाली.