राज्यातील मोठय़ा तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे एकीकडे या तुरुंगांचा कोंडवाडा झाला आहे तर दुसरीकडे शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये कोंडवाडय़ातील कष्टमय जीवनातून मानसिक आजार उद्भवण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. तुरुंग विभागाच्याच अहवालानुसार सुमारे ३० टक्क्य़ांहून अधिक कैद्यांमध्ये वेगवेगळे मानसिक आजार जडल्याचे आढळून आले असून ही संख्या जास्त असण्याची भीती उच्चपदस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी या कैद्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी योगा व प्राणायाम शिक्षणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील भायखळा, आर्थररोड मध्यवर्ती कारागृह, ठाणे, तळोजा, येरवडा, नागपूर, नाशिक, औरंगाबादसह प्रमुख कारागृहातील सुमारे नऊ हजार कैद्यांपैकी अनेकांना नैराश्य, स्किझोफ्रेनिया, झोप न लागणे, अस्वस्थता असे वेगवेगळे मानसिक आजार जडले आहेत. यामध्ये महिला कैद्यांचे प्रमाण जास्त असून कुटुंबाची काळजी, खुले वातावरण न मिळणे, जेलमधील गैरव्यवस्था अशी अनेक कारणे यामागे असल्याचे ज्येष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मोठी शिक्षा भोगत असलेल्या बऱ्याचशा कैद्यांनी रागाच्या भरात खून अथवा गंभीर गुन्हा केला असून त्यांची गुन्हेगारी मानसिकता नसल्यामुळे त्यांच्यामध्ये मनोरुग्ण बनण्याचे प्रमाण जास्त आहे. शेताच्या बांधाच्या जागेवरून अथवा गावकीच्या वादातून खून केलेले कैदीही मानसिक आजाराने त्रस्त आहेत. या पक्क्य़ा कैद्यांसाठी ठरावीकच कामे असल्यामुळे त्यांच्या या अस्वस्थेत भर पडते. या साऱ्याची माहिती घेऊन केवळ वैद्यकीय उपचारापुरते मर्यादित न राहाता या कैद्यांना योगासने तसेच प्राणायाम म्हणजेच श्वसनाचे व्यायाम शिकविल्यास त्यांचे एकूणच आरोग्य चांगले राहू शकते हे लक्षात घेऊन गृहविभागाचे प्रधान सचिव (तुरुंग) डॉ. विजय सतबीर सिंग यांनी पहिल्या टप्प्यात मोठय़ा तुरुंगांमध्ये तज्ज्ञ योग शिक्षकांच्या माध्यमातून योगा व श्वसनाचे व्यायाम शिकविण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी तुरुंगातील कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षित करण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून भविष्यात कैद्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे. डॉ. विजय सतबीर सिंग यांनी याबाबत सांगितले की, अनेक स्वयंसेवी संस्था योगप्रशिक्षण देण्यासाठी स्वत:हून पुढे आल्या असून वरिष्ठ तुरुंग अधिकारी स्वाती साठे यांना या संस्थांची निवड करण्यास सांगितले आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे मानसिक आजाराचे कैद्यांमधील प्रमाण वाढले असून योग व प्राणायामामुळे त्यांच्या आरोग्यात निश्चित सुधारणा होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नागपूर येथील तुरुंगात ही योजना सुरू असून लवकरच सर्व प्रमुख तुरुंगांमध्ये कैद्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.
’ कैद्यांना नैराश्य, स्किझोफ्रेनिया, झोप न लागणे, अस्वस्थता असे वेगवेगळे मानसिक आजार
’यामध्ये महिला कैद्यांचे प्रमाण जास्त असून कुटुंबाची काळजी, खुले वातावरण न मिळणे, जेलमधील गैरव्यवस्था अशी अनेक कारणे यासाठी जबाबदार