शहरातील ३७४५ शस्त्र परवानाधारकांचा ठावठिकाणाच पोलिसांना लागत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून गेले वर्षभर मुंबई पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार शहरातील शस्त्र परवानाधारकांची विस्तृत माहिती पोलिसांना सादर करावी लागते. मात्र, मुंबई पोलिसांनी दिलेल्या १२ हजार शस्त्र परवानाधारकांपैकी मे, २०१५ पासून आतापर्यंत केवळ ९ हजारांच्या आसपास परवानाधारकांचा माग पोलिसांना काढता आला आहे.
परवानाधारकांचा ठावठिकाणा शोधण्यास पोलिसांना यश येत नसल्याने या शस्त्रांच्या आधारे कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास त्याचा माग काढणेही अवघड जाईल. त्यामुळे, ही माहिती जमा करणे मुंबई पोलिसांपुढेही आव्हान बनले आहे. उर्वरित ३७४५ शस्त्र परवानाधारकांचा शोध एप्रिल, २०१६च्या अखेपर्यंत न लागल्यास स्थानिक पोलिसांबरोबरीनेच गुन्हे शाखेचीही मदत घ्यावी लागेल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई शहरात ११ ते १२ हजार नागरिकांनी शस्त्र परवाने काढले आहेत. वेळोवेळी या परवानाधारकांची माहिती अद्ययावत करण्यात येते. तसेच, परवानाधारकांनी स्वतच्या निवासाची जागा बदलल्यास, परवानाधारकांचा मृत्यू झाल्यास किंवा देशाबाहेर गेल्यास त्याची माहिती पोलिसांना देणे बंधनकारक असते. त्यातच, केंद्र सरकारने देशभरातील शस्त्र परवानाधारकांची माहिती ‘राष्ट्रीय शस्त्र परवाना माहितीसंग्रहा’त (नॅशनल डेटाबेस ऑफ आम्र्ड लायसन्स-एनडीएएल) एकत्रित करण्याची प्रक्रिया २०१५ पासून सुरू केली.
मुंबई पोलीस आयुक्तालयाने ही माहिती मिळविण्यास सुरुवात केल्यानंतर ज्यांनी परवान्याचे नूतनीकरण केले नाही अशा ६३०४ जणांची यादी आयुक्तालयाने मे, २०१५ मध्ये प्रसिद्ध केली. त्यानंतर पोलिसांनी या परवानाधारकांची माहिती घेण्यास स्थानिक पोलिसांनाही सांगितले. परंतु, ऑक्टोबर, २०१५ पर्यंत अवघ्या ९६३ परवानाधारकांची माहिती ऑक्टोबर, २०१५ पर्यंत आयुक्तालयाकडे आली. ५३४७ शस्त्र परवानाधारकांनी पोलिसांशी संपर्क साधलेला नाही. त्यानंतर पुन्हा पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना परवानाधारकांची माहिती मिळवण्यात पाठपुरावा करण्याचे आदेश दिले. गेल्या चार महिन्यांत १६०२ परवानाधारकांची माहिती मिळाली असून अजूनही ३७४५ परवानाधारक बेपत्ताच आहेत. या परवानाधारकांची माहिती लवकरात लवकर मिळविण्याचा आमचा प्रयत्न सुरू असून एप्रिल, २०१६ पर्यंत ही माहिती मिळविण्याचे लक्ष्य असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. परवानाधारकांची माहिती पोलिसांकडे नसणे ही धोकादायक बाब असून या शस्त्रांच्या मदतीने काही अनुचित प्रकार घडल्यास मूळ आरोपींना पकडणे जिकिरीचे होऊ शकते. त्यामुळेच या परवानाधारकांची माहिती असणे आवश्यक असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. जर एप्रिल २०१६ पर्यंत हे परवानाधारक सापडले नाहीत किंवा त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला नाही तर त्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची मदत घेण्याचा मानस असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले.