लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली येथे ३९४ मीटरच्या अतिरिक्त मध्यवर्ती बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वांद्रे-कुर्ला संकुल ते शीळफाटा दरम्यान २१ किमी लांबीच्या बोगद्याचे काम करणे सोयीस्कर झाले असून बोगद्याच्या कामाला गती मिळणार आहे, असे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एनएचएसआरसीएल) सांगण्यात आले.

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन ५०८ किमी लांबीची असून त्यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे २१ किमी लांबीचा वांद्रे-कुर्ला संकुल ते शीळफाटा बोगदा. तसेच २१ किमी बोगद्यापैकी ठाणे खाडीतील ७ किमी लांबीचा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा ठरणार आहे. यासह सुरुवातीचे वांद्रे -कुर्ला संकुल हे स्थानक भूमिगत स्वरूपात बांधले जाणार जाणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळफाट्यापर्यंत २१ किमीचा बोगदा खोदण्यासाठी टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) आणि न्यू ऑस्ट्रीयन टनेलिंग पद्धत अशा दोन्ही पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. बोगद्याच्या १६ किमी भागासाठी तीन टनेल बोअरिंग मशीनचा वापर केला जाणार आणि उर्वरित ५ किमीच्या भागासाठी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत वापरली जाईल. हा बोगदा जमिनीपासून सुमारे २५ ते ६५ मीटर खोल असणार आहे. त्याचा सर्वात खोल भाग शीळफाटाजवळ पारसिक डोंगराच्या खाली ११४ मीटर जमिनीखाली असणार आहे, असे एनएचएसआरसीएलकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा-मुंबई विभागाचा निकाल ९५.८३ टक्के, गतवर्षीच्या तुलनेत २ टक्क्यांनी वाढ

जमिनीपासून सुमारे २६ मीटर खोल अतिरिक्त मध्यवर्ती बोगद्यामुळे ३.३ किमी बोगद्याचे खोदकाम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने करणे सुलभ होणार आहे. तसेच दोन्ही बाजूंनी १.६ मीटर बोगद्यासाठी एकाचवेळी प्रवेश मिळेल.

घणसोली येथील अतिरिक्त मध्यवर्ती बोगद्याचे काम ६ डिसेंबर २०२३ रोजी सुरू करण्यात आले. सहा महिन्यांच्या आता ३९४ मीटर लांबीचा बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले. यावेळी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली २७ हजार ५१५ किलो स्फोटकांचा वापर करून एकूण २१४ नियंत्रित स्फोट करण्यात आला. तसेच सुरक्षित खोदकामासाठी उच्च दर्जाच्या उपकरणांचा वापर केला.