यंदाचे वर्ष निवडणुकांचे वर्ष म्हणूनच गाजणार आहे. निवडणुकांची धामधूमही सुरू झाली आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणाही कामाला लागली आहे. विशेष म्हणजे मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील १९ ते २२ या वयोगटांतील सुमारे ५० ते ६० लाख तरुण पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सव्वाअकरा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातील मतदारांची संख्याही ८ कोटींच्या जवळपास जाण्याची शक्यता आहे.
मार्च-एप्रिलध्ये लोकसभा निवडणुका होतील. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील. २००९मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर मतदारनोंदणी प्रक्रिया सातत्याने सुरूच आहे. अलीकडेच त्यासाठी मोठी मोहीम राबविण्यात आली. सुमारे ४० लाखांच्या आसपास नव्याने मतदारांची नोंदणी झाली असल्याचे निवडणूक कार्यालयातील सूत्राकडून सांगण्यात आले. मागील निवडणुकीच्या वेळी एकूण ७ कोटी ६२ लाख एवढी मतदारसंख्या होती. मतदार याद्यांची छाननी करून अंतिम यादी तयार झाल्यानंतर राज्यातील एकूण मतदारांचा आकडा ८ कोटींच्या घरात जाईल, असा अंदाज आहे.  मागील निवडणुकीनंतर गेल्या चार वर्षांत १९ ते २२ या वयोगटांतील सुमारे ५० ते ६० लाखांपर्यंत तरुण वर्गाची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे.
 येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राज्यातील ५० लाखांहून अधिक पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावण्याची संधी मिळणार आहे. पुढील आठवडय़ात अंतिम व अद्ययावत मतदार याद्या जाहीर करण्यात येणार आहेत.