मुंबई : औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमांना मिळणारा प्रतिसाद गेल्या काही वर्षांपासून वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे अव्वल गुण मिळवणाऱ्यांचीही पावले आता औद्योगिक प्रशिक्षण अभ्यासक्रमांकडे (आयटीआय) वळू लागली आहेत. यंदा दहावीला शंभरपैकी शंभर गुण मिळवणाऱ्या ५३ विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशासाठी अर्ज केले आहेत.
व्यावसायिक अभ्यासक्रम, पारंपरिक अभ्यासक्रमातील पदवी त्यानंतर कौशल्य विकास किंवा तंत्रनिकेतनातील अभ्यासक्रम असा गुणांनुसार विद्यार्थ्यांचा प्राधान्यक्रम असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून बदलू लागले आहे. राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. प्रवेश क्षमतेच्या तुलनेत दुप्पट विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. त्याचबरोबर दहावीला १०० टक्के मिळवणाऱ्या ५३ विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. १०० टक्के मिळवणाऱ्या राज्य मंडळाच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी हे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक आहे.
यंदा राज्यातील १२२ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले होते. या विद्यार्थ्यांसह ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या चारशेहून अधिक आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार विद्यार्थ्यांचा बदलता कल स्पष्ट होत आहे. यंदा राज्यातील साधारण १ लाख ४९ हजार जागांसाठी ३ लाख ८ हजार ४३९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांची संस्थेनुसार पहिली प्रवेश यादी शुक्रवारी जाहीर होणार आहे. प्रवेश यादीनुसार प्रत्यक्ष प्रवेश घेण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू होईल.
बदलांचा परिणाम.. आयटीआय करताना बारावीची परीक्षाही देण्याची मुभा दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना देण्यात येते. त्याचबरोबर यंदापासून कोणत्याही शाखेतून आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदविकेच्या थेट दुसऱ्या वर्षांला प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलांमुळे आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचे मत प्राचार्यानी व्यक्त केले.
गुण आणि अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची
संख्या (गुण टक्क्यांत)
१०० ५३
९६ ते ९९ २
९१ ते ९५ ३५२
८६ ते ९० ३५९९
८१ ते ८५ १२१४९