दिवसभरात १,०१० बाधित; ४७ जणांचा मृत्यू

मुंबई : रविवारी मुंबईत १,०१० नवीन रुग्ण आढळले असून, ४७ रग्णांचा मृत्यू झाला. मात्र एकूण बाधितांपैकी ८० टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १८ हजारांपेक्षा कमी झाली आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा वेग मंदावला असून हे प्रमाण सरासरी ०.८२ टक्के इतके आहे. मात्र मलबार हिल, नानाचौक, गिरगाव, मुंबादेवी, बोरिवली, वांद्रे पश्चिम, चेंबूर, दहिसर, कांदिवली, मस्जिद बंदर, डोंगरी, गोरेगाव, कुलाबा, भायखळा या दहा विभागांतील रुग्णवाढीचा वेग सरासरीपेक्षा जास्त आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी ८५ दिवसांवर गेला असला तरी या दहा विभागांतील रुग्ण दुपटीचा कालावधी ८५ दिवसांपेक्षा कमी आहे. नाना चौक-मलबार हिलचा भाग असलेल्या ‘डी’ विभागात हा कालावधी ५० दिवसांवर पोहोचला आहे.

रविवारी १०१० रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांचा आकडा १,२८,७२६ वर गेला आहे. तर ७१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत ८० टक्के  म्हणजेच १,०३,४६८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर सध्या केवळ १५ टक्के म्हणजे १७,८२८ रुग्ण उपचार घेत आहेत.

मृत्यूदर कमी करणे हे पालिकेपुढचे मोठे आव्हान असून दररोज ४५ पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू होतो आहे. रविवारी ४७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

मृतांपैकी ३५ जणांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये ३२ पुरुष व १५ महिला होत्या. मृतांचा एकूण आकडा ७१३० वर गेला आहे.

ठाणे जिल्ह्य़ात १,२४७ नवे रुग्ण

’ जिल्ह्य़ात रविवारी १ हजार २४७ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या आता १ लाख ६ हजार ५६६ इतकी झाली आहे. जिल्ह्य़ात दिवसभरात २९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण मृतांची संख्या ३ हजार ३८ वर पोहोचली झाली आहे.

’ रविवारी आढळलेल्या रुग्णांत नवी मुंबईतील ३५१, कल्याण-डोंबिवली शहरातील ३२०, ठाणे शहरातील १८९, मीरा-भाईंदरमधील १५३, ठाणे ग्रामीणमधील ८५, बदलापूर शहरातील ५३, उल्हासनगर शहरातील ४२, भिवंडी शहरातील ३४ आणि अंबरनाथ शहरातील २० रुग्णांचा समावेश आहे. तर, मृतांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील ८, ठाणे शहरातील ७, उल्हासनगर शहरातील ५, नवी मुंबईतील ३, मीरा-भाईंदरमधील ३, ठाणे ग्रामीणमधील २ आणि भिवंडीतील एका रुग्णाचा समावेश आहे.