सरकारतर्फे रोकडरहित व्यवहारांसाठी ‘आधार पे’ या अ‍ॅपची घोषणा झाली आणि काही तासांच्या अवधीत या नावाशी साधम्र्य असलेल्या अ‍ॅप्सनी अ‍ॅप बाजारात गर्दी केली. यामुळे अनेक दुकानदार आणि ग्राहक गोंधळात पडले आहेत. यामुळे आधार पेची सुविधा वापरण्यासाठी नेमके कोणते अ‍ॅप डाऊनलोड करायचे याबाबत संभ्रमावस्था आहे.

सध्या ‘आधार पे’ हे अ‍ॅप यूपीआय अ‍ॅपशी जोडले गेलेले आहेत. यामुळे ‘भीम’ आणि काही बँकांनी तयार केलेले यूपीआय अ‍ॅप्स हेच अधिकृत मानले जात आहेत. हे अ‍ॅप डाऊनलोड करत असताना अ‍ॅप विकसित करणाऱ्या कंपनीचे नाव निश्चितपणे पाहणे आवश्यक आहे. तसे न केल्यास चुकीचे अ‍ॅप डाऊनलोड करून तुमची माहिती अ‍ॅप विकसित करणाऱ्या कंपनीकडे जाऊ शकते. यामुळे या कंपन्यांकडे आपली माहिती गेली तरी त्यावर दाद मागण्याची सोय नसते. यामुळे अशा अ‍ॅपपासून सावधान राहणे हे आवश्यक आहे.

याअ‍ॅपची विक्रेत्यांसाठीची आवृत्ती अद्याप अ‍ॅप बाजारात आली नसल्याचे ‘नॅशनल पेमेंट कौन्सिल ऑफ इंडिया’ (एनपीसीआय)चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्याधिकारी ए. पी. होटा यांनी सांगितले, तर सरकार आधारचे नाव वापरून खासगी कंपन्या सुरू करत असलेल्या अ‍ॅपवर बंदी आणू शकते, असे मत सायबर विधिज्ञ अ‍ॅड्. प्रशांत माळी यांनी नोंदविले.

गोंधळवून टाकणारे अ‍ॅप्स

आज अ‍ॅप बाजारात आधार पे अ‍ॅप असा शोध घेतल्यावर अनेक अ‍ॅप्सचे पर्याय समोर उभे राहतात. यातील अनेक अ‍ॅप्स हे केवळ आधार पे ही सुविधा नेमकी काय आहे याबाबत माहिती देतात, तर काही अ‍ॅप आधारचा तपशील एक्सेल फॉरमॅटमध्ये उपलब्ध करून देतात. याशिवाय बोटाचे ठसे, आधारवरील क्यूआर कोड स्कॅन करणारे अ‍ॅप्सही या बाजारात उपलब्ध असून हे अ‍ॅप्स ‘आधार पे’चा शोध घेणाऱ्यांसाठी गोंधळवून टाकणारे आहेत.