लोकशाहीची हत्या झाल्याची टीका केली जात आहे. पण जेव्हा देशात लोकशाहीच अस्तित्वात नाही तर तिची हत्या कशी होईल, असा उपहासात्मक सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी मध्यरात्री भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांचा शपथविधी रोखण्यास नकार दिला. त्यानंतर आज सकाळी येडियुरप्पांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपालांनी काँग्रेस-जेडीएस ऐवजी भाजपाला निमंत्रण दिल्याने या निर्णयावर देशभरातून टीका होताना दिसते. त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी बहुमत सिद्ध करणे त्यांना कठीण जाणार आहे. ज्यांची संख्या जास्त त्यांना राज्यपालांनी सरकार बनवण्याचे निमंत्रण दिले आहे. लोकशाहीची हत्या झाल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. पण जेव्हा देशात लोकशाहीच अस्तित्वात नाही तर तिची हत्या कशी होईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

केंद्र सरकारची पुन्हा हातचलाखी : उद्धव ठाकरे

राज्यपाल वजूभाई वाला यांनी भाजपाला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिल्याने काँग्रेस-जेडीएस आघाडीने या निर्णयावर टीका केली. त्यांच्या निर्णयाविरोधात काँग्रेस-जेडीएस हे बेंगळुरूत आंदोलन करत आहेत. भाजपाने लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्यावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, पेट्रोल दरवाढीवरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला. कर्नाटक निवडणुकीपुरते केंद्र सरकारच्या सांगण्यावरून पेट्रोलची दरवाढ रोखली होती. आता निकाल लागताच पुन्हा दरवाढीचे भूत जनतेच्या मानगुटीवर बसवल्याचा आरोप केला. कर्नाटकातील निवडणूक संपल्यानंतर केंद्र सरकारने पुन्हा एकदा ‘हातचलाखी’चा प्रयोग केला असल्याचा टोलाही शिवसेनेने लगावला.