मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या शंभरच्या घरात गेल्यामुळे बाधितांच्या प्रमाणात एक टक्क्याहून अधिक वाढ झाली आहे. शहरात सध्या सर्वाधिक रुग्ण हे उच्चभ्रू वस्तीत आढळत आहेत. जनुकीय बदलांमुळे रुग्णवाढ होत आहे का याची पडताळणी करण्यासाठी पुढील आठवडय़ात जनुकीय चाचण्या करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासून शहरातील रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वाढत असून मागील दोन दिवसांत तर १०० हून अधिक नवे रुग्ण आढळले आहे. शहरात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात एवढी रुग्णसंख्या होती. रुग्णसंख्या वाढल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही साडेपाचशेच्या वर गेली आहे. सध्या शहरात ५६३ रुग्ण उपचाराधीन आहेत.

शहरात उच्चभ्रू भागात जास्तीत जास्त रुग्ण आढळत आहेत. यात प्रामुख्याने वांद्रे पश्चिम, अंधेरी पश्चिम, खार आणि कुलाबा या भागांचा समावेश आहे. एकाच इमारतीमध्ये किंवा एकाच ठिकाणी रुग्ण मोठय़ा संख्येने आढळलेले नाहीत. यातील बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणातच बरे होत असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येमागे विषाणूचा जनुकीय बदल कारणीभूत आहे का याची पडताळणीही केली जात आहे. पुढील आठवडय़ामध्ये बाधितांच्या जनुकीय चाचण्या केल्या जाणार आहेत, असेही काकाणी यांनी सांगितले. सध्या शहरात दैनंदिन चाचण्यांचे प्रमाण दहा हजारांच्याही खाली गेले आहे. तेव्हा चाचण्या वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना पालिकेने विभागांना केल्या आहेत, असे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

मृत्यूचे प्रमाण कमी

रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. सध्या रुग्णालयात केवळ दहा रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच मृत्यूचे प्रमाणही खूप कमी असल्याचे आढळले आहे.

सांडपाण्याच्या चाचण्या

सांडपाण्यातून पुरेसे बाधित नमुने सापडलेले नसल्यामुळे या फेरीमध्ये रुग्णांच्या नमुन्यांबरोबर सांडपाण्याच्या नमुन्यांचीही जनुकीय चाचणी केली जाणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव कितपत आहे, याचा आढावा यामुळे घेता येणार आहे, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.