बिहारमधील जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अपेक्षांचा पालापाचोळा केल्यानंतर मित्रपक्ष शिवसेनेनेही भाजपला खडेबोल सुनावताना भविष्यकाळ शिवसेनेचाच असल्याचा टोमणा मारला आहे. महाराष्ट्रात कधीही निवडणुका घेतल्या तरी शिवसेना स्वबळावर विजयाची गरूडझेप घेईल, हाच बिहारच्या निकालाचा संदेश असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.
बिहार निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाले. सत्तेचा दावा करणाऱ्या भाजप आघाडीला या निवडणुकीत शंभरीचा आकडाही पार करता आलेला नाही. त्याचवेळी नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव या जोडीने बिहारमधील जनतेचा पुन्हा एकदा विश्वास संपादन करून १७८ जागा महाआघाडीच्या पदरात पाडून घेतल्या आहेत. हे निकाल जाहीर होत असतानाच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात उद्या जरी निवडणुका घेतल्या तरी शिवसेना स्वबळावर सत्तेत येईल, असे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मध्ये सोमवारी लिहिलेल्या ‘बिहारमध्ये बहार’ अग्रलेखात भाजपवर टीका करण्यात आली आहे.
अग्रलेखात लिहिण्यात आले आहे की, ‘लालू यादव यांच्यावर ‘जंगल राज’ व ‘भ्रष्टाचारा’चे आरोप करूनही बिहारात त्यांचा पक्ष पहिल्या क्रमांकाचा ठरला. काँग्रेसच्या युवराज राहुल गांधींना ‘पप्पू’ ठरवूनही त्यांना बिहारात उत्तम जागा मिळाल्या. आता काँग्रेसला सत्तेत वाटा मिळेल. मोदी यांनी पंतप्रधान म्हणून बिहारात ३०च्या वर प्रचंड सभा घेतल्या. त्या सभांचे फलित म्हणायचे तर ५५ जागासुद्धा नाहीत. शिवसेना बिहारात एका जिद्दीने लढली. राष्ट्रवादी काँग्रेस, ‘ओवेसी’च्या एमआयएमपेक्षा शिवसेनेचे मताधिक्य जास्त आहे हा एक प्रकारे विजयच आहे. मोठ्या प्रमाणावर ‘साधनसंपत्ती’ पणास लावूनही बिहारात भाजपचा पराभव झाला. याउलट नितीशकुमार यांनी आहे त्या साधनसंपत्तीच्या बळावर बिहारमध्ये ‘बहार’ आणली. शिवसेनेने साधेपणाने निवडणुका लढवून मतांची टक्केवारी वाढवली. मामला तसा बरोबरीचाच मानावा लागेल. शिवसेना महाराष्ट्राबाहेर पसरते आहे. भविष्यकाळ शिवसेनेचाच आहे.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After bihar election results shivsena criticized bjp
First published on: 09-11-2015 at 10:53 IST