मुंबई : करोना महासाथीच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० पासून सर्वसामान्यांना मंत्रालयातील प्रवेश बंद करण्यात आला होता. आता तब्बल दोन वर्षांनंतर सामान्य जनतेसाठी मंत्रालयाची दारे उघडी जाणार आहेत. येत्या १८ मेपासून मंत्रालयात प्रवेशासाठी पुन्हा प्रवेश पत्रिका देण्यात येणार आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने १६ मार्च २०२० रोजी एक आदेश काढून सर्वसामान्यांच्या मंत्रालयातील प्रवेशावर निर्बंध लागू केले. करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुढे मंत्रालयासह शासकीय कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थितीही मर्यादित ठेवण्यात आली. मंत्रालयाबाहेरील शासकीय अधिकाऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आला. केवळ अतिमहत्त्वाच्या व तातडीच्या बैठकीसाठी त्यांना मंत्रालयात प्रवेश दिला जात होता. राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव खूपच कमी झाला आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने मंत्रालयात सर्वसामान्य जनतेला प्रवेश देण्याची प्रवेश पत्रिका पद्धती पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार आता येत्या १८ मेपासून सर्वसामान्यांना प्रवेशपत्रिका देण्याची व्यवस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृह विभागाने सोमवारी तसा आदेश जारी केला आहे.