मुंबई : गेल्या साडेचार वर्षांमध्ये उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलच्या तिकीट आणि पास विक्रीतून मध्य आणि पश्चिम रेल्वेने ६४ कोटी ८० लाख रुपयांची कमाई केली आहे. मात्र हे उत्पन्न लक्षात घेता केवळ एका लोकलचीच किंमतच वसूल झाली आहे. सध्या धावत असलेल्या एका वातानुकूलित लोकलची किंमत सुमारे ५५ कोटी रुपयांदरम्यान आहे.
पहिली वातानुकूलित लोकल डिसेंबर २०१७ मध्ये पश्चिम रेल्वेवर धावू लागली. ही सेवा सुरू होऊन साडेचार वर्षे होत आली तरीही या सेवेद्वारे रेल्वे प्रशासन फारसे उत्पन्न मिळवता आलेले नाही. वातानुकूलित लोकलमळे आतापर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेला ६४ कोटी ८० लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. यापैकी ५५ कोटी ६८ लाख ५४ हजार ६४६ रुपये पश्चिम रेल्वेचे प्रवासी उत्पन्न आहे. डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१८ पर्यंत पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत तीन कोटी १८ लाख १० हजार रुपये आणि डिसेंबर २०२१ ते मे २०२२ मध्ये नऊ कोटी २५ लाख ७९ हजार रुपये उत्पन्नाची भर पडली होती. मध्य रेल्वेलाही वातानुकूलित लोकलमधून एकूण नऊ कोटी १२ लाख ४१ हजार ३६५ रुपये मिळाले आहे. २०२० मध्ये २४ लाख ९९ हजार रुपये उत्पन्नाची भर पडली, २०२२ मध्ये वाढ होऊन सात कोटी ७१ लाख रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
रेल्वेसाठी खर्चिकच
पश्चिम रेल्वेवर चार वातानुकूलित लोकल असून यातील तीन लोकलच्या ३२ फेऱ्या होतात. एक लोकल देखभाल, दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये असते. तर मध्य रेल्वेवर पाच वातानुकूलित लोकल असून यापैकी चार सेवेत आहेत. त्याच्या ५६ फेऱ्या होतात. सध्या उत्पन्न मिळत असले तरीही ते कमीच आहे. वातानुकूलित लोकलची किंमत सुमारे ५५ कोटी रुपये आहे. आतापर्यंत एका लोकलचा खर्च वसूल झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एका वातानुकूलित लोकलची देखभाल, दुरुस्ती आणि त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी खर्च येतो. त्यामुळे ही लोकल सध्यातरी रेल्वेला खर्चिकच ठरत आहे.
दर कमी केल्याने प्रवासी संख्येत वाढ
तिकिट दरात केलेली कपात आणि वाढत्या उकाडय़ामुळे वातानुकूलित लोकलच्या प्रवासी संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकलने फेब्रुवारी महिन्यात दिवसाला पाच हजार ९३९ प्रवासी प्रवास करीत होते. तीच संख्या मे महिन्यात २६ हजार ८१५ वर पोहोचली आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर दिवसाला १५ हजार प्रवासी वातानुकूलित लोकलने प्रवास करीत आहेत. तर दिवशी सुमारे पाच हजार ५५६ तिकिटांची विक्री होत आहे.
करोनामुळेही फटका
करोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून काही दिवस वातानुकूलित लोकल सेवा बंद ठेवण्यात आली होती. करोनाचा झपाटय़ाने संसर्ग वाढत असल्याने वातानुकूलित लोकलने प्रवास करणे अनेक जण टाळत होते. परिणामी, करोनाकाळात सुरुवातीला उत्पन्नही कमीच झाले.

पश्चिम रेल्वेला मिळालेले उत्पन्न
(डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१८ )
वर्षे प्रवासी उत्पन्न
२०१७-१८ ३ कोटी ८१ लाख रु
२०१८-१९ १८ कोटी ५२ लाख ७ हजार ७८९ रु
२०१९-२० २३ कोटी २९ लाख ७० हजार रु
२०२०-२१ १ कोटी ४२ लाख ८६ हजार रु
२०२१-२२ ९ कोटी २५ लाख ७९ हजार ६६९ रु
मध्य रेल्वेला मिळालेले उत्पन्न
वर्षे उत्पन्न
२०२० २४ लाख ९९ हजार ७७२ रु
२०२१ १ कोटी १५ लाख ६२ हजार १२६ रु
२०२२ ७ कोटी ७१ लाख ७९ हजार ४६७ रु