मान्य परिमाणांपेक्षा गाडीची रूंदी जास्त; बंबार्डिअरप्रमाणे परवानगी देण्याची रेल्वे मंडळाकडे मागणी
एप्रिलच्या सुरुवातीला मुंबईत दाखल झालेल्या वातानुकुलित गाडीच्या चाचण्या अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. या गाडीची उंची-रूंदी ठरावीक मापापेक्षा जास्त असल्याने ती मुंबईच्या उपनगरीय मार्गावर चालवण्याबाबत साशंकता आहे. मात्र याआधी आलेल्या बंबाíडअर किंवा सिमेन्स कंपनीच्या गाडय़ाही याच मापाच्या असल्याने या गाडीलाही परवानगी मिळावी, अशी विनंती करणारे पत्र आरडीएसओने रेल्वे बोर्डाकडे पाठवले आहे. रेल्वे बोर्डाकडून उत्तर आल्यानंतरच या गाडीची चाचणी सुरू होणार आहे.
वातानुकुलित गाडीची चाचणी या मे महिन्यातच व्हावी, यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद आग्रही आहेत. गाडीच्या इतर सर्व अंगांची चाचणी कोणत्याही मोसमात होऊ शकते. मात्र वातानुकुलन यंत्रणेची चाचणी उन्हाळ्यातच उत्तम प्रकारे होईल. त्यात मे महिन्यातील उन्ह जास्त तीव्र असते. त्यामुळे ही चाचणी मेच्या मध्यावर सुरू केली जाईल, असा विश्वास ब्रिगेडिअर सूद यांनी व्यक्त केला होता.
प्रत्यक्षात कुर्ला कारशेडमध्ये असलेली ही गाडी मध्य रेल्वेच्या ठरावीक परिमाणांपेक्षा जास्त रूंद आणि उंच असल्याचे आढळले आहे. या गोष्टीबाबत रेल्वे सुरक्षा आयुक्त आक्षेप घेऊ शकतात. हे टाळण्यासाठी रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्डस् ऑर्गनायझेशनने (आरडीएसओ) आता थेट रेल्वे बोर्डाला पत्र लिहिले आहे.
या पत्रात या रूंदी आणि उंचीबद्दल माहिती असून त्याबाबतचे स्पष्टीकरणही करण्यात आले आहे. हे पत्र आरडीएसओने १८ एप्रिल रोजी पाठवले असून त्याबाबत रेल्वे बोर्डाने अद्याप उत्तर दिलेले नाही.
याआधी उपनगरीय रेल्वेमार्गावर आलेल्या सिमेन्स, बंबाíडअर किंवा मुंबई विभागात येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील एलएचबी डबे यांची रूंदी आणि उंचीही नियोजित परिमाणापेक्षा थोडीशी जास्त आहे. मात्र या गाडय़ा कोणत्याही त्रासाविना धावत आहेत. त्यामुळे वातानुकुलित गाडीला परवानगी मिळण्यात अडचण येणार नाही, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वे बोर्डाकडून ही परवानगी मिळाली की, त्यानंतर या गाडीच्या चाचण्यांचे वेळापत्रक तयार केले जाणार आहे.