राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मते मात्र सारे काही आलबेल!

मुंबईतील हवेची गुणवत्ता धोक्यात आली असून मंगळवारी हवा प्रदूषणाचा निर्देशांक (एअर क्वालिटी इण्डेक्स- एक्यूआय) घसरला आहे. केंद्र सरकारच्या ‘सफर’ या प्रदूषण मापक यंत्रणेच्या पाहणीत ही बाब उघड झाली असली तरी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर मात्र सारे काही आलबेल असल्याचेच चित्र आहे!

दिवाळीच्या चार दिवसांमध्ये मुंबईतील हवेची गुणवत्ता धोक्यात आली होती. दिवाळीनंतर काही दिवस हवेची गुणवत्ता समाधानकारक होती. मात्र मंगळवारी गुणवत्ता पुन्हा घसरल्याची नोंद केंद्र सरकारच्या ‘सफर’ने केली. शहरातील अनेक भागांमध्ये धुरकट वातावरण होते. त्यातही अंधेरी, मालाड आणि माझगाव परिसरातील हवेच्या गुणवत्तेचे प्रमाण अतिशय वाईट असल्याचे ‘सफर’ने नोंदवले. याउलट महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर मात्र या परिसरांसह शहरातील हवेची गुणवत्ता चांगल्या पातळीवर असल्याचे निर्देशित केले जात होते.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील तापमानात घट झाल्याने हवेच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सध्या मुंबईत रात्रीच्या वेळी थंडी जाणवते. थंड वातावरणात हवेची घनता वाढते. शिवाय या वातावरणात वारा वाहण्याचा वेगही मंदावत असल्याने प्रदूषकांचे कण वाहून जाण्यास मदत होत नाही. त्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळत असल्याची माहिती पर्यावरणतज्ज्ञ विद्याधर वालावलकर यांनी दिली.

मंगळवारी सर्वसाधारण हवेचा निर्देशांक २०७ होता तर ‘सफर’ने विभागानुरूप केलेल्या नोंदीत शहरात सर्वाधिक प्रदूषणाचे प्रमाण माझगाव (३९८) येथे असल्याचे निर्देशित करण्यात आले. त्या पाठोपाठ अंधेरी (३५३) आणि मालाड (३२४) विभागांची गुणवत्ता अत्यंत वाईट पातळीवर ढासळल्याची नोंद करण्यात आली. येत्या काही दिवसांमध्ये शहरातील तापमानात घट होणार असल्याने हवेची गुणवत्ताही ढासळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आकडय़ात तफावत

महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानेही मुंबई महानगर प्रदेशातील १५ विभागांच्या हवेच्या गुणवत्तेची नियमित चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. या तपासणीची आकडेवारी मंडळाच्या संकेतस्थळावर दाखवली जाते. मात्र मंगळवारी मुंबईतील काही विभागांची हवेची गुणवत्ता ढासळल्याची नोंद ‘सफर’ने केली असताना मंडळाच्या संकेतस्थळावरील निर्देशांक हवा उत्तम असल्याचे दाखवीत होते. त्यामुळे या दोन्ही विभागांच्या आकडेवारीत प्रचंड तफावत असल्याचे चित्र दिसले.