रावसाहेब दानवे यांचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्या पाठिंब्यावर भाजपचे सरकार स्थापन झाल्याने अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेते असून त्यांचाच आदेश सर्व आमदारांसाठी बंधनकारक असेल, असा दावा करत भाजपला सत्तेचे वेड लागल्याची टीका करणाऱ्या शिवसेनेचे खासदार यांनाच खरे तर वेडय़ांच्या इस्पितळात दाखल करण्याची वेळ आल्याची बोचरी टीका भाजपचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.

भाजपच्या प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत रावसाहेब दानवे यांनी संजय राऊत आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांवर हल्ला चढवला. भाजप विरोधी पक्षाच्या आमदारांना फसवत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला असला तरी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांना डांबून हॉटेलमध्ये ठेवल्याचे राज्याची जनता उघडय़ा डोळ्यांनी पाहत आहे. या तिन्ही पक्षांचे आमदार पंचतारांकित पाहुणचार झोडत असताना भाजपचे आमदार मात्र मतदारसंघात जाऊन अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदत करत आहेत, असे दानवे यांनी नमूद केले.

आम्ही आज सत्तेत आलो नाही, पण सत्ता येण्याच्या कल्पनेनेच संजय राऊत यांना वेड लागले आहे. काय बोलावे आणि काय बोलू नये हेही त्यांना कळेनासे झाले आहे. अजित पवारांनी भाजप सरकारला पाठिंब्याचे पत्र दिले तेव्हा ते राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते होते. नंतर त्यांना काढल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते करत असले तरी अजित पवार हेच गटनेते असून त्यांचा आदेश राष्ट्रवादीच्या आमदारांना मान्य करावा लागेल, असा दावाही दानवे यांनी केला.

स्थिर सरकारसाठी  युती

अडचणीत असलेल्या महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केल्याचे स्पष्टीकरण दानवे यांनी दिले. पूर्वी याच अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात भ्रष्टाचारी ठरवत त्यांची जागा तुरुंगात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते, मग आता त्याच अजित पवारांसह युती कशी असा प्रश्न केल्यावर मुख्यमंत्र्यांच्या पूर्वीच्या विधानाबद्दल भाष्य करणे दानवे यांनी टाळले.