मुंबई : ही हिंदुत्व, विचार आणि तत्त्वांची लढाई असून जनतेला निवडणुकीपासून वाचविण्यासाठी पर्यायी सरकार सत्तेवर आणण्यात येत आहे, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केले. राज्यातील सत्तानाटय़ाच्या शेवटच्या अंकात एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी घोषित करून पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, भाजप-शिवसेना युतीने २०१९ मध्ये विधानसभा निवडणुका जिंकून १७० हा बहुमताचा आकडा गाठला होता. पण शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जनमत शब्द फिरवून वेगळा विचार केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर ज्यांना विरोध केला, त्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. शिवसेनाप्रमुखांनी कुख्यात दाऊद इब्राहिमला विरोध केला असताना त्याच्याशी संबंध असलेले एक मंत्री तुरुंगात गेले, तरी मंत्रीपदावर राहिले. सरकार प्रचंड भ्रष्टाचारी होते व दोन मंत्री तुरुंगात गेले. स्वा. सावरकरांना विरोध करणाऱ्यांबरोबर उध्दव ठाकरे सत्तेत होते. शिवसेना कार्यकर्त्यांऐवजी त्यांनी इतरांना प्राधान्य दिले.

शिंदे यांचे सरकार हे हिंदुत्ववादी विचारांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या संकल्पना पुढे नेणारे असेल. मेट्रोसह अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प, मराठा व ओबीसींचे राजकीय आरक्षण आदी मुद्दय़ांवर शिंदे सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

काही निर्णयांचा पुनर्विचार

राज्यपालांनी बहुमत सिध्द करण्यास सांगितल्यावर मंत्रिमंडळाची बैठक घेऊ नये, असा नियम आहे. पण ठाकरे सरकारने बुधवारी घेतलेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव करण्याचा आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचे निर्णय घेतले. हे निर्णय आम्हाला मान्य आहेत. मात्र काही निर्णयांचा पुनर्विचार केला जाईल, असे फडणवीस यांनी नमूद केले.