पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर जाणार असल्यामुळे येत्या १४ एप्रिलला इंदू मिलच्या जमिनीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे भूमिपूजन होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
इंदू मिलच्या जमिनीवर आंबेडकर स्मारक उभारण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे, त्याच्याविरोधात काही महिन्यांपूर्वी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने चैत्यभूमी ते इंदू मिल असा मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चाला सरकारच्या वतीने शिक्षण मंत्री विनोद तावडे सामोरे गेले होते. त्या वेळी ‘काही झाले तरी येत्या १४ एप्रिलला आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येईल’ अशी घोषणा तावडे यांनी केली होती. परंतु पुढे त्याबाबत काहीच हालचाल झाली नाही.
विधान भवनात शुक्रवारी रामदास आठवले व अविनाश महातेकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन स्मारकाबाबत काय प्रगती आहे, अशी विचारणा केली. त्यावर पंतप्रधान व आपण स्वत: परदेशदौऱ्यावर जाणार असल्यामुळे १४ एप्रिलला स्मारकाचे भूमिपूजन करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
लंडनमधील बाबासाहेबांचे वास्तव्य असलेल्या घराचेही
स्मारकात रूपांतर करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी काही ठोस उत्तर दिले नाही, असे आठवले म्हणाले. १४ एप्रिलला शक्य नसेल, तर त्यापुढची एखादी तारीख निश्चित करून पंतप्रधानांच्या हस्तेच स्मारकाचे भूमिपूजन व्हावे, अशी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याचे आठवले यांनी सांगितले.