मुंबई ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या जेलमध्ये आहे. याच प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीचं नाव समोर येत आहे. अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे हिच्या घरी एनसीबीने छापे टाकले असून ती आता चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे.

तिची चौकशीही एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हेच करणार आहेत. आर्यन खानच्या चौकशीची जबाबदारीही वानखेडेंकडेच होती. अनन्यासोबत तिचे वडील अभिनेता चंकी पांडेदेखील कार्यालयात पोहोचले आहेत. या चौकशीदरम्यान आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं चंकी तसंच अनन्याच्या परिवाराने सांगितलं आहे. गरजेची सर्व माहिती आपण एनसीबीला पुरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

एनसीबीचे पथक मुंबईच्या वांद्रे येथील बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी सकाळी पोहोचले होते. या प्रकरणात अजून फारशी माहिती समोर आलेली नाही, पण असे मानले जाते की एनसीबीचा हा तपास आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असू शकतो. अनन्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची मैत्रीण आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम राबवण्यात येत आहे.

हेही वाचा – अनन्या पांडेच्या घरी एनसीबीचे पथक दाखल; आर्यन खान प्रकरणाशी संबंध असण्याची शक्यता

एनसीबीने बुधवारी आर्यन खान आणि उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीचे ड्रग्ज चॅट कोर्टात सादर केले होते. त्यामध्ये ड्रग्जबद्दल चर्चा झाली होती. या चॅटच्या आधारे एनसीबीने न्यायालयाकडे आर्यनसह उर्वरित आरोपींच्या रिमांडची मागणी केली आहे. अनन्या बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. अनन्याने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

२ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकल्यानंतर एनसीबीने प्रथम आर्यन आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे. आर्यन सध्या मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये कैद आहे. न्यायालयाचा निर्णय येण्यापूर्वीच, या प्रकरणात एक नवीन माहिती देखील समोर आली.

एनसीबीने आर्यनच्या ड्रगशी संबंधित व्हॉट्सअॅप चॅट कोर्टाच्या ताब्यात दिले आहे, ज्यात एका नवीन अभिनेत्रीसोबत ड्रग्सबद्दल संभाषण आहे. ही अभिनेत्री त्यावेळी कोण होती, यावर कोणताही खुलासा झाला नाही.