मुंबई : अंधेरी एमआयडीसी परिसरातील चार मजली इमारतीला गुरुवारी लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. अखेर तब्बल १८ तास प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर अग्निशमन दलातील जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा कार्यरत नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या इमारतीला दिलेल्या बांधकामविषयक परवानग्यांची तपासणी करुन संबंधितांवर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले.

अंधेरीच्या एमआयडीसी परिसरातील रोड नंबर २२, तुंगा पॅराडाईझ येथील रोल्डा नेट कंपनीच्या सव्‍‌र्हरला गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास भीषण आग लागली. क्षणातच आगीने अक्राळविक्राळ रुप धारण केले. आगीमुळे संपूर्ण इमारतीत धुराचे साम्राज्य पसरले होते. या काचेच्या इमारतीत वायुविजनाची योग्य ती व्यवस्था नसल्यामुळे सर्वच मजल्यावर धूर पसरला होता. अग्निशमनाचे काम करणाऱ्या जवानांना धुराचा सामना करावा लागत होता. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याला आगीने विळखा घातला. त्यामुळे हे दोन्ही मजले आगीत भस्मसात झाले.

आगीची वर्दी मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अग्निशमन दलाचे १२ बंब आणि १० जम्बो वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी गुरुवारी सकाळी ११.३० पासून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले होते. आग आटोक्यातच येत नव्हती. वारंवार भडकणाऱ्या आगीवर पाण्याचा मारा करण्यात येत होता. शुक्रवारी पहाटे ४.५५ च्या सुमारास म्हणजे तब्बल १८ तास २० मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आहे.

एमआयडीसी अग्निशमन यंत्रणेकडे रोल्टा इमारतीस दिलेल्या परवानगीबाबतची माहिती मुंबई अग्निशमन दलाने मागविली आहे. अग्निसुरक्षाविषयक नियमांचा भंग केल्या प्रकरणी संबंधित कंपनीवर नोटीस बाजवली होती का याचीही पडताळणी करण्यात येत आहे. या प्रकरणी कंपनी दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.