पश्चिम रेल्वेवर अंधेरी-विरारदरम्यान लोकलच्या नवीन २० फेऱ्या; दादर-विरारदरम्यान ९ नवीन फेऱ्या

पश्चिम रेल्वेवरील उपनगरांतून त्यातही बोरिवलीच्या पलीकडून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या पाहता यंदा लागू होणाऱ्या लोकलच्या नवीन वेळापत्रकात दादर ते विरार दरम्यानच्या लोकल फेऱ्या वाढवण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. नवीन वेळापत्रक ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापासून लागू होत असून ३२ नवीन फेऱ्या प्रवाशांना मिळतील. यापैकी २९ फेऱ्या फक्त उपनगरातील प्रवाशांसाठीच आहेत. तर तीनच फेऱ्या  चर्चगेटपर्यंत चालवण्यात येतील. महत्त्वाचे म्हणजे २९ फेऱ्यांमध्येही सर्वाधिक २० फेऱ्या या अंधेरी ते विरार ते अंधेरीसाठी असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी दिली.

पश्चिम रेल्वेचा मुंबई उपनगरीय लोकलचा पसारा हा चर्चगेटपासून ते विरार-डहाणूपर्यंत आहे. सध्या ८६ लोकलच्या १,३२३ लोकल फेऱ्या पश्चिम रेल्वेमार्गावर होतात. २०१४-१५ सालापासून पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांमध्ये फारशी वाढ झालेली नाही. त्यातच प्रवासी संख्याही वाढत गेल्याने लोकलवर प्रवाशांचा भार वाढत गेला. यात विरार, वसई, नालासोपारा, बोरिवली, मालाड, अंधेरी येथून चर्चगेटच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय असल्याचे पश्चिम रेल्वेच्या निदर्शनास आले. त्यामुळे येत्या ऑक्टोबर २०१७ पासून लागू केल्या जाणाऱ्या लोकलच्या नवीन वेळापत्रकात दादर ते विरारदरम्यान लोकल फेऱ्या कशा वाढतील यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. नवीन वेळापत्रकानुसार ३२ वाढीव फेऱ्या प्रवाशांना मिळणार असून यामध्ये १५ फेऱ्या डाऊन, तर १७ फेऱ्या अप मार्गासाठी असतील. महत्त्वाची बाब म्हणजे ३२ पैकी २० लोकल फेऱ्या फक्त अंधेरी ते विरार ते अंधेरीदरम्यानसाठीच आहेत. त्यामुळे या पट्टय़ातील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. गर्दीच्या वेळी प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी दादर ते विरारदरम्यान सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी ४ लोकल फेऱ्याही चालवण्यात येतील, असेही जैन यांनी सांगितले.