प्लास्टिकच्या बाटल्या आणि टेट्रा पॅकमधून दारुविक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. हा निर्णय लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
‘ग्लोबल एन्व्हायरो सोल्युशन्स’ या पर्यावरणीय संस्थेने ही या प्रकरणी जनहित याचिका केली आहे. याचिकेतील दाव्यानुसार, प्लास्टिकच्या वापरामुळे प्रक्रिया होऊन ही दारू आरोग्यास हानीकारक ठरू शकते.
टेट्रा पॅक पाकिटे बनविण्यासाठी अ‍ॅल्युमिनियमचा वापर केला जातो. त्यामुळे तेही दारू प्रदूषित करू शकते. याशिवाय दारू असलेल्या प्लास्टिक बाटल्या आणि टेट्रा पॅक जास्त वेळ उन्हात ठेवले आणि ती दारू प्राशन केल्यास ते हानीकारक ठरू शकते. आपला दावा योग्य आहे हे दाखविण्यासाठी याचिकेत आरोग्य अहवालाचा दाखला देण्यात आला आहे.
अशी प्रदूषित आणि आरोग्यास हानीकारक दारू प्राशन करणाऱ्यांना शारीरिक विकारांची समस्या जडण्याची शक्यता असल्याची भीतीही याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे न्यायालयाने जनहित लक्षात घेऊन सरकारच्या निर्णयावर बंदी घालावी, अशी विनंती याचिकादारांनी केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती अनुप मोहता यांच्या खंडपीठासमोर १३ मार्च रोजी सुनावणी होणार आहे.