आजच्या आपल्या नवदुर्गा आहेत, अनाथ बाळांना हक्काचे घर देणारी ‘पाखर संकुल’ ही संस्था स्थापन करणाऱ्या शुभांगीताई. ९३ मुलांना दत्तक देऊन हे संकुल आज २२ बाळे सांभाळत आहेत. इतकंच नव्हे तर एक पालक असणाऱ्या मुलांना ‘विद्यादायिनी’, ‘बालसंगोपन’, ‘शुभसंस्कार वर्ग’, ‘उन्मेष प्रकल्प’ आदी योजनांद्वारे स्वावलंबनाचा धडा देणाऱ्या तसेच निराधार स्त्रियांसाठी ‘कुटुंब सल्ला केंद्र’, ‘समुपदेशन केंद्र’ तसेच विविध प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र करणाऱ्या शुभांगी बुवा या दुर्गेच्या कर्तृत्वाला सलाम!
‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोच भार साहे.’ हे शब्द देवदूताच्या रूपात आपल्या कृतीने प्रत्यक्षात आणणाऱ्या सोलापूर येथील शुभांगीताई बुवा. त्यांनी सुरू केली आहे, अनाथ बाळांना हक्काचे घर देणारी संस्था, ‘पाखर संकुल’! आज यातल्या ९३ मुलांना दत्तकविधानामार्फत स्वत:चे घर मिळाले आहे. संस्थेतल्या या बाळांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच परिसरातील गरीब मुलांच्या सर्वागीण विकासासाठी येथे ‘विद्यादायिनी’, ‘बालसंगोपन योजना’, ‘शुभसंस्कार वर्ग’, ‘उन्मेष प्रकल्प’ येथे राबविले जातात. येथील सुमारे ६०० स्त्रियांना कुटुंब सल्ला केंद्र, समुपदेशन केंद्राचा लाभ मिळाला असून १५० स्त्रियांच्या त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने रुग्णसाहाय्यिका प्रशिक्षण, महिला व बालसमुपदेशन प्रशिक्षण वर्ग आयोजित करून शुभांगीताईंनी समाजातील अनेक उपेक्षितांना स्वावलंबनाचा मार्ग सुकर करून दिला आहे.
टिपू सुलतान दरबारी नायब दिवाणजी असलेले शुभराय महाराज, त्यांची चाकरी सोडून दाखल झाले ते सोलापुरात. दत्त चौकात त्यांनी बांधलेला मठ सर्व स्तरांतील लोकांचे भक्तिकेंद्र झाले. या शुभराय मठात जयकृष्ण आणि निर्मला बुवा यांच्या पोटी शुभांगीताईंचा जन्म झाला. आणि तिथेच त्या वाढल्या. नंतर मास्टर ऑफ सोशल वर्क ही पदवी संपादन करून पुण्यात एका संस्थेत काम करू लागल्या. मात्र आपल्या गावातच राहून नवे विश्व उभारण्याचे त्यांचे स्वप्न होते. प्रवचन, कीर्तन, भजन याद्वारे होणाऱ्या भक्तीला सामाजिक भान द्यायचे व एका ऊर्जा केंद्राची निर्मिती करायची या सामाजिक बांधिलकीतून १९९७ मध्ये टाकून दिलेल्या, कोणतीही जन्मओळख नसलेल्या एक दिवस ते सहा वर्षे वयोगटांतील अनाथ बाळांसाठी ‘पाखर संकुल’ या संस्थेची स्थापना शुभांगीताईंनी केली. त्याचअंतर्गत सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून ८ मे २००३ मध्ये एका बाळाच्या बारशाने ‘दत्तक विधान’ या संस्थेचीही सुरुवात झाली.
पुणे, महिला व बालकल्याण समिती, यांच्या मान्यतेनुसार आंतरदेशीय दत्तक योजनेचे काम ही संस्था करते. इथे येणारी बाळे कुमारी मातांची, इच्छेविरुद्ध मातृत्व लादलेल्यांची, विधवांची किंवा अतिदारिद्रय़ भोगणारी, एक पालक असलेली असतात, उच्चभ्रू म्हणवणाऱ्या लोकांच्या प्रमादाचा निसर्गदत्त मूर्त आविष्कार असतात. एखादे बाळ मुंग्यांच्या वारुळात सापडते तर एखादे काटेरी झुडपात. हातपाय बांधलेल्या अवस्थेत रेल्वेच्या डब्यात तर एस.टी.मध्ये बाकाखाली. तर एखादे घाणेरडय़ा नाल्याच्या काठाशी, कचराकुंडीत. ही सगळी बाळे बालकल्याण समितीतर्फे संस्थेत दाखल होतात. शुभांगीताई म्हणतात, ‘इथे येणारे प्रत्येक बाळ म्हणजे ‘स्ट्रगल बेबी’!’ जीवन-मरणाचा संघर्ष करतच हे बाळ जगात येते. त्यांना जगवण्याचे आव्हान ‘पाखर संकुल’ स्वीकारते आणि ते निभावतेही. आत्तापर्यंत येथे १७३ बाळे सांभाळली गेली आहेत.
आरोग्यदृष्टय़ा सुदृढ बाळांना दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांना न्यायालयामार्फत दत्तक दिले जाते. ‘ज्या बाळांना आम्ही फक्त नाव दिलेले असते, त्यांना क्षणात, कूळ गोत्रासह अनेक नाती, प्रतिष्ठा मिळते. हा माझ्यासाठी सार्थकतेचा क्षण असतो,’ असे त्या म्हणतात. दत्तक घेतलेल्या पालकांचा दर वर्षी १४ नोव्हेंबरला मेळावा असतो. आत्तापर्यंत ९३ मुले दत्तक घरी आनंदाने नांदत आहेत.
या अनाथ मुलांना सांभाळण्याबरोबरच त्यांचा निगुतीने, प्रेमाने सांभाळ करणाऱ्या, यशोदामातेच्या अर्थात तेथील दाईच्या मुलांचे काय? त्यांची खंत ओळखून शुभांगीताईंनी परिसरातील गरीब मुलांसाठी शासनाची ‘बालसंगोपन योजना’ २००७ मध्ये सुरू केली. एक पालकत्व ही एक अट असलेल्या या मुलांच्या शैक्षणिक व इतर खर्चाकरिता महिन्याला ४२५ रुपये मिळतात. शासनाची ही योजना येथील फक्त २५ मुलांकरिताच असल्याने इतर मुलांसाठी समाजातील दानशूर व्यक्ती शोधायला सुरुवात झाली आणि त्यातून २०१० पासून ‘विद्यादायिनी योजना’ सुरू झाली. वर्षांला ८००० रुपये भरायचे अन् एक गरजू बाळ दत्तक घ्यायला सुरुवात झाली. या योजना राबविताना एक गोष्ट प्रकर्षांने सामोरी आली ती म्हणजे या मुलांचा सभोवतालही त्यांच्यासाठी पोषक नाही की त्यांना ठोस भवितव्यही नाही. सभोवताली व्यसनी, गुंडांची वस्ती, दारू पिणे, मारझोड बघत ही मुले मोठी होतात. संस्थेत येणाऱ्या कैवल्य (बदललेले नाव) नावाच्या ६वी मध्ये शिकणाऱ्या एका मुलाने आपल्या आईला जिवंत जळताना बघितले. या मुलाच्या मनात समाजाविरुद्ध विद्रोह निर्माण झाला तर तो वेगळी वाट निवडून आयुष्य खराब करून घेईल, असे शुभांगीताईंना वाटले आणि त्यातूनच निर्मिती झाली ती ‘शुभसंस्कार’ वर्गाची! याशिवाय युवांसाठी कलाकौशल्य वर्ग, संभाषण वर्ग, आरोग्य शिबिरे, कथामाला असे अनेक कल्पकतापूर्ण उपक्रम राबवले जातात. समाजातील डॉक्टर, इंजिनीअर, कलाकार यांचे मार्गदर्शन देणारा ‘किशोर, किशोरी प्रकल्प’सुद्धा राबविण्यात येतो. त्यातूनच मुलांच्या स्वावलंबनासाठी पायाभूत व्यवसाय प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
एकदा एका कुमारी मातेने शुभांगीताईंना प्रश्न विचारला की, माझ्या बाळाचे भविष्य तुम्ही चांगले घडवाल हे निश्चित. परंतु माझ्यासारख्या महिलांनी काय करायचे? एक दहा वर्षांची मुलगी तिचे बाळ घेऊन आली. तिच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवून तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. अशा अनेक दुर्दैवी महिलांना मानसिक आधार द्यावा लागतो. पतिनिधन, फसवणूक, नैसर्गिक मोह, समाजातील परंपरेचा धाक, परिस्थितीच्या जड बेडय़ा एक पाऊल पुढे टाकू देत नाहीत. अशा महिलांची शुभांगीताई आई होतात. त्यातूनच २००६ पासून कुटुंब सल्ला केंद्र व कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५-०६ अंतर्गत सेवा पुरविणारी संस्था म्हणून काम सुरू झाले. यातून अनेक घटस्फोटांना स्थगिती मिळाली. ही संस्था इतक्या भक्कमपणे महिलांच्या पाठीशी उभी राहते की, दारू पिऊन छळणारा, माहेरून पैसे आण म्हणून धमकावणारा महिलेचा नवरा घाबरतो आणि प्रश्न सुटण्यास मदत होते.
सोलापूरजवळील बार्शी येथेही आता संस्थेने ‘महिला समुपदेशन केंद्र’ सुरू केले आहे. तर ‘पाखर संकुला’त दाखल होणाऱ्या एकाकी, निराधार स्त्रियांनाही त्या नाबार्डच्या अर्थसाहाय्याने प्रशिक्षित करतात. रुग्णसहाय्यिका प्रशिक्षण, महिला व बालसमुपदेशन प्रशिक्षण, बेबी किडस् प्रशिक्षणे आदी वर्गामुळे या स्त्रिया आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्र होतात. संस्थेचा दरमहा खर्च २ लाख २५ हजार रुपये असून संस्था पूर्णपणे समाजावर अवलंबून आहे. आज ‘पाखर संकुला’त २२ बाळे आहेत.
‘पाखर संकुल’ ही भगिनी संस्था आहे. महिलांचे एकत्रीकरण हीच या संस्थेची जमेची बाजू. समाजाला आधार देणारा हा जगन्नाथाचा रथ चालवणाऱ्या शुभांगी बुवासारख्या दुर्गाशक्तीची समाजाला नितांत गरज आहे, हेच या निमित्ताने अधोरेखित होते.
पाखर संकुल,
दत्त चौक, सोलापूर ४१३००७
संपर्क – ९८५०९७८७०१
pakhar_sankul@rediffmail.com
loksattanavdurga@gmail.com