विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापाठोपाठ आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही राज्य सरकारच्या करवाढीवर ताशेरे ओढत सरकारने आपल्या वर्षपूर्ती सोहळ्यासाठी करवाढ केल्याचा आरोप केला आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारने करवाढ करून जनतेची फसवणूक केली आहे. आघाडी सरकारच्या लोकोपयोगी योजनांना भाजपकडून कात्री लावण्यात आल्याचे चव्हाण यावेळी म्हणाले. बिहारला केंद्र सरकारने विशेष पॅकेज देऊ केले पण महाराष्ट्र सरकार राज्यासाठी केंद्राकडून पॅकेज आणू शकले नाही. यातूनच केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार असूनही राज्याचा केंद्रावर काहीच वचक नसल्याचे दिसून येते, असेही चव्हाण पुढे म्हणाले.

पेट्रोल आणि डिझेलवरील स्थानिक संस्था कर(एलबीटी) राज्य सरकारने रद्द केला पण त्यावर दोन रुपयांची कर वाढ करून डोळ्यांत धूळफेक करायचे काम सरकारने केले आहे. या महिनाअखेर सरकारला एक वर्ष पूर्ण होत असल्याने राज्यभर वर्धापन दिनाचे सोहळे साजरे करता यावेत यासाठी करवाढ करण्यात आल्याची टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली होती. त्याचा पुनरुच्चार करीत अशोक चव्हाण यांनी करवाढीविरोधात काँग्रेस येत्या ५ आणि ६ ऑक्टोबरला राज्यभर आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.

दरम्यान, ‘सनातन’च्या बाबतीत सरकार हातचे राखून ठेवल्याची भूमिका बजावताना दिसत असल्यामुळे या संस्थेला सरकारचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवालही यावेळी चव्हाण यांनी उपस्थित केला. राज्यात पत्रकार, पोलिसांना धमकावले जात असूनही सरकारला सनातनवर बंदी घालण्यासाठी आता आणखी किती पुराव्यांची गरज आहे, तेही सरकारने सांगावे असेही ते पुढ म्हणाले.