कर्नाटक सरकारच्या विशेष तपास पथकाने गौरी लंकेश हत्या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात सनातन संस्थेचे नाव आरोपी म्हणून घेतले आहे. यातूनच सनातन संस्था ही अत्यंत घातक संस्था असून हिंसक कारवायांमध्ये गुंतलेली आहे, या वस्तुस्थितीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या अगोदरही या संदर्भातील अनेक पुरावे समोर आले असतानाही सनातन संस्थेवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे सनातन संस्थेला वाचवणारे सरकारमधील साधक कोण? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की, गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी सनातन संस्थेशी संबंधित आहेत आणि सनातन संस्थेने इतर कट्टरवादी संघटनांच्या मदतीने ही हत्या घडवून आणली असा स्पष्ट उल्लेख कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात आहे. तसेच नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी व  गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडाशीही सनातन संस्थेचा संबंध आहे, हेही यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सनातन संस्थेवर बंदी घालावी या मागणीचा चव्हाण यांनी पुनरुच्चार केला.