चहा हवाच, आणि चहावालाही हवा. पण काळा चहा नको. वनस्पती चहा हवा. जनतेने तोच चहा प्यावा, तोच आरोग्यालाही चांगला असतो, असा आरोग्यदायी योगोपदेश करीत नरेंद्र मोदी यांच्या चहा मोहिमेला पाठिंबा देऊन योग गुरु बाबा रामदेव यांनी मोदी यांचे समर्थन केले.
मुंबईत आलेल्या बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व ‘राष्ट्रवादी’ पक्षांनी एकत्र आलेच पाहिजे, असे सूचित करताना, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही तो इशारा असल्याचे संकेत त्यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेसला रालोआमध्ये सहभागी करून घेण्याच्या चर्चेनंतर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी तीव्र विरोध दर्शविला होता. त्या पाश्र्वभूमीवर बाबा रामदेव यांनी मुंबईतच केलेल्या या विधानास भाजपाच्या वर्तुळात राजकीय महत्वही प्राप्त झाले आहे. लहान राज्यांच्या भाजपच्या भूमिकेसही त्यांनी पाठिंबा दिला. लहान राज्यांच्या निर्मितीमुळे प्रशासन सोयीचे होते, असे ते म्हणाले.
सत्यपाल सिंह यांनी राजकारणात यावे, अशी आपलीच इच्छा होती, कारण चांगल्या व्यक्तींनी राजकारणात आलेच पाहिजे अशी आपली भूमिका आहे, असेही बाबा रामदेव म्हणाले.