मी तुमच्यावर घराणेशाही लादली असेल तर विसरून जा. काँग्रेस-राष्ट्रवादीसारखी घराणेशाही आमच्याकडे नाही, असे सांगून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांना सांभाळून घ्या, असे भावनिक आवाहन दसरा मेळाव्यानिमित्त शिवाजी पार्क येथे जमलेल्या शिवसैनिकांना केले.  
उद्धव व आदित्यला मी लादलेले नाही. तुम्ही त्यांचा स्वीकार केला आहे. यापुढेही त्यांना सांभाळा, इमानाला महत्त्व द्या, असे शिवसेनाप्रमुखांनी सांगताच उपस्थित तमाम शिवसैनिकांचे हृदय हेलावून गेले.
ऐकीकडे शिवसैनिकांच्या भावनेला हात घालतानाच, दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व परिवारावर घणाघाती टीका करत गांधी घराण्याला राजकारणातूनच हद्दपार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आज मी साफ थकलो आहे, शारीरिकदृष्टय़ा कोसळलो आहे. बोलताना धाप लागते. नीट चालता येत नाही, असे सांगत शिवसेनाप्रमुख चित्रफितीच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद साधत होते. मैदान गाजवणारा मी माणूस, किती दौरे, किती भाषणे केली, आता सर्व अवयव बिघडले आहेत. डॉक्टरांनी शरीराची नुसती प्रयोगशाळा केली आहे. मध्यंतरी उद्धव आजारी पडला. तो घरी आला आणि मला लीलावती रुग्णालयात नऊ दिवस दाखल करावे लागले, असे सांगतानाही बाळासाहेबांच्या बोलण्यात एक रग जाणवत होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृपाशंकर यांच्यासह सोनिया गांधी, त्यांचे जावई रॉबर्ट वढेरा, राहुल, प्रियांका या साऱ्यांचाच बाळासाहेबांनी आपल्या ठाकरी भाषेत समाचार घेतला.
शिवाजी पार्कवरील शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण शिवसैनिकांसाठी एक अतुट नाते आहे. यापूर्वीही एकदा शिवसेनाप्रमुख प्रकृतीमुळे येऊ शकले नव्हते. आजही शिवसेनाप्रमुख प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाहीत. शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांच्या पुस्तकाचे बुधवारी सकाळी त्यांच्याच हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे  यांनी त्याचे जाहीर अनावरण केले. याविषयी बोलताना बाळासाहेब म्हणाले, किती तरी व्यंगचित्रे काढली. त्यातील काही वाळवीने खाल्ल्यामुळे अखेर जाळून टाकावी लागली. ज्या दादरमध्ये शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेना भवन जेथे आहे, त्याच दादरमध्ये शिवसेनेला धूळ चारली गेल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मराठी माणूस एकत्र आला तर काँग्रेसला सहज सत्तेवरून खाली खेचू शकतो, परंतु येथे दोन तुकडे का झाले याचा विचार करा, असा प्रश्न अत्यंत भावूक होत त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेचा पाया मराठीचा आहे. हिंदुत्वचा मुद्दा घेतल्याबरोबर मराठी सोडले का, असा सवाल सुरु झाला. आम्ही जसे होतो तसेच आहोत. स्वीकारायचे असेल तर स्वीकारा, असे सांगून ते म्हणाले की, बाबरी मशीद पडली त्यावेळी शिवसेना होती म्हणूनच मुंबई वाचली. यापुढेही मुंबईत कोणी नंगानाच करण्याचा प्रयत्न केल्यास दणका देण्यास शिवसेना तयार आहे.    
अजित गुलाबचंदना ओळखता का?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लवासाच्या भानगडी आपल्याला माहीत आहेत, असे सांगून अजित गुलाबचंद यांना तुम्ही ओळखता का, असा सवाल बाळासाहेबांनी केला. मुंबई बहुभाषिकांची आहे या पवारांच्या विधानाचा समाचार घेताना पृथ्वीराज चव्हाण यांनी लवासाच्या भानगडींची फाइल आपल्या मांडीखाली दडवून ठेवल्याचेही त्यांनी सांगितले. मंत्रालयाला आग लागल्यामुळेच यांचे फावले आहे. श्वेतपत्रिका काढली तरी हे वाचणार असल्याचा टोलाही बाळासाहेबांनी लगावला.
नेशन ऑफ चीटर्स
देशाला वाचवाचे असेल तर सोनिया, राहुल, प्रियांका, वडरा आणि  अहमद पटेल या पंचकडीला हटवावे लागेल. आज देशभर घोटाळे सुरू आहेत. त्याचवेळी क्लिन चिट देण्याचेही काम जोरात सुरू आहे असे सांगून हा देश आता क्लिन चिटवाल्यांचा नाही तर ‘नेशन ऑफ चीटर्स’चा झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सोनियापासून चणेफुटाणे विकणाऱ्या कृपाशंकपर्यंत साऱ्यांनाच हटविण्याची गरज असल्याचे सांगून तुमच्या अंगात रक्त आहे का आणि असल्यास ते कधी सळसळणार असा सवालही त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray latest speech
First published on: 17-11-2012 at 05:17 IST