मुंबई : तौक्ते चक्रीवादळात जलसमाधी मिळालेल्या ‘पी ३०५’ तराफा आणि ‘वरप्रदा’ नौकेवरील कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम मंगळवारीही सुरू होते. आतापर्यंत सुमारे ५५ मृतदेहांची ओळख पटली असून ५२ मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. दरम्यान, रायगड आणि गुजरात किनाऱ्यावर सापडलेल्या १३ मृतदेहांची ओळख पटवणे अद्यापही बाकी असून पालघर नजीक आणखी एक मृतदेह सापडला असून त्याची ओळख पटलेली नाही.

तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून दुर्घटनाग्रस्त झालेल्या ‘पी ३०५’ तराफा आणि ‘वरप्रदा’ नौकेवरील कर्मचाऱ्यांच्या शोधासाठी नौदलाने मोहीम राबविली होती. सोमवारी ही मोहीम संपुष्टात आली. या शोध मोहिमेत ७० मृतदेह सापडले होते. तर रायगडच्या किनाऱ्यावर ८, गुजरातमधील वलसाडजवळ ७, दीव दमणच्या किनाऱ्यावर १ आणि पालघरनजीक १ मृतदेह सापडले आहेत. त्यातील वलसाड येथील दोन आणि दीव दमणच्या किनाऱ्यावरील मृतदेहांची ओळख पटली असून अन्य १४ मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ५५ मृतदेहांची ओळख पटली असून अजून अन्य मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. समुद्रातील पाण्यात राहिल्याने अनेक मृतदेह कुजलेले आहेत. त्यांची ओळख पटवणे अवघड असल्यामुळे डीएनएन चाचणीआधारे मृतांची ओळख पटवण्यात येणार आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

संकटाला न घाबरता सामोरे गेलो..

‘वरप्रदा’ नौकेवर अडकलेले साहेब भुनिया आणि फ्रान्सिस सिमोन हे दोघे दुर्घटनेतून सुखरूप बचावले. जहाजाच्या कप्तानाने ते बुडण्याच्या काही क्षण आधी धोक्याची (ट्रेस बटन) सूचना देणारी कळ दाबली. त्याने आधीच ही कळ दाबली असती तर लवकर मदत मिळाली असती, असे भुनिया यांनी सांगितले.

चक्रीवादळाची सूचना आधीच मिळाली होती, मात्र गॅल कन्स्ट्रक्टर जहाजाला सुरक्षित ठिकाणी सोडण्याची जबाबदारी आमच्या नौकेवर होती. गॅल कन्स्ट्रक्टरला सुरक्षित ठिकाणी सोडून आम्ही आमची नौका नजीकच नांगर टाकून उभी केली होती. मात्र वाऱ्याचा वेग आणि लाटांच्या तडाख्यात आमची नौका बुडाली. या काळात मला फारशी भीती वाटली नाही. या संकटाला न घाबरता सामोरे जायचे हे निश्चित केले होते. नौका बुडायला लागल्यावर अन्य कर्मचाऱ्यांनी जीवरक्षक जॅकेट परिधान करून समुद्रात उडय़ा मारल्या. बचावलेलो आम्ही दोघेजण राफ्टच्या सहाय्याने समुद्रात उतरलो होतो. हे राफ्ट २० कर्मचाऱ्यांना वाहून नेण्याची क्षमता असलेले होते. मात्र त्यामध्ये दोघेजणच असल्याने लाटांच्या तडाख्यात राफ्ट उलटण्याची शक्यता होती. त्यामुळे आम्ही राफ्टमध्ये पुरेसे वजन राहण्यासाठी त्यामध्ये अर्धा ते एक फुटापर्यंत पाणी भरून ठेवले. तसेच राफ्टमध्ये मध्यभागी बसून ते दोन्ही पायांनी दाबून ठेवले होते, असे त्यांनी सांगितले. तीन तास लाटांशी जीवनाचा संघर्ष सुरू होता. त्यानंतर नौदलाने आमची सुखरूप सुटका केली, असे भुनिया यांनी सांगितले.