scorecardresearch

बेलापूर-गेट वे ऑफ इंडिया ‘वॉटर टॅक्सी’ फेब्रुवारीपासून

२०० प्रवासी क्षमतेची देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा नोव्हेंबर २०२२ पासून मुंबईतील जलमार्गावर सुरू झाली.

बेलापूर-गेट वे ऑफ इंडिया ‘वॉटर टॅक्सी’ फेब्रुवारीपासून
गेट वे ऑफ इंडिया – बेलापूर वॉटर टॅक्सी सेवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरू होणार आहे. (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

मुंबई : गेट वे ऑफ इंडिया – बेलापूर वॉटर टॅक्सी सेवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरू होणार आहे. मुंबई बंदर प्राधिकरणाने यासाठी नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडला  परवानगी दिली. यानुसार सोमवारी ते शुक्रवारदरम्यान सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशी फेरी सुरू करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या सेवेमुळे ६० मिनिटांत प्रवास  शक्य होणार आहे.

२०० प्रवासी क्षमतेची देशातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा नोव्हेंबर २०२२ पासून मुंबईतील जलमार्गावर सुरू झाली. मुंबई  क्रूझ टर्मिनल – मांडव्यादरम्यान ही सेवा आहे.  सातही दिवस तीन-तीन अशा एकूण सहा फेऱ्या (मुंबई – मांडवा तीन आणि मांडवा – मुंबई तीन) सुरू झाल्या. मात्र प्रतिसादाअभावी काही दिवसांतच, डिसेंबर २०२२ मध्ये सोमवार ते शुक्रवारदरम्यान ही टॅक्सी पूर्णत: बंद करण्याची नामुष्की कंपनीवर ओढावली. सध्या केवळ शनिवार आणि रविवारी मांडवा – मुंबई क्रूझ टर्मिनल आणि मांडवा ते बेलापूरमार्गे मुंबई क्रुझ टर्मिनल अशी सेवा सुरू ठेवली. 

आता कंपनीने  गेट वे ऑफ इंडिया – बेलापूर अशी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनी गेल्या दोन माहिन्यांपासून प्रयत्न करत होती. मात्र यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाकडून परवानगी न मिळाल्याने आणि काही तांत्रिक अडचणींमुळे ती रखडली होती. अखेर या सेवेला मुंबई बंदर प्राधिकरणाने हिरवा कंदील दाखविला आहे. याबाबतचे परवानगी पत्र २५ जानेवारी रोजी जारी करण्यात आल्याची माहिती कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापासून ही वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही या अधिकाऱ्याने दिली.

सोमवार ते शुक्रवार सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशा दोन फेऱ्या गेट वे ऑफ इंडिया – बेलापूर मार्गावर होणार आहे. सकाळी ८.३० वाजता बेलापूर जेटीवरून वॉटर टॅक्सी सुटणार आहे. ती ९.३० वाजता गेट वे ऑफ इंडियाला पोहचेल. तर संध्याकाळी ६.३० वाजता गेट वे ऑफ इंडिया येथून वॉटर टॅक्सी सुटणार असून संध्याकाळी ७.३० वाजता बेलापूर जेट्टीला पोहचेल. यासाठी  ३०० आणि ४०० रुपये भाडे आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 02:35 IST
ताज्या बातम्या