बंगळुरूमध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री एका पार्टीत महिलांचा विनयभंग झाल्याचे उघडकीस आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारास पाश्चात्य आचार-विचार जबाबदार असल्याचे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी केल्यानंतर आता समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबु असिम आझमी यांनीही ‘तारे’ तोडले आहेत. महिलांनी परिधान केलेले शॉर्ट ड्रेस या घटनेला कारणीभूत असून महिलांच्या मते जितकी नग्नता तितकी फॅशन जास्त, असे वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे.

बंगळुरू येथील ब्रिगेड रोड आणि एम. जी. रोडच्या जंक्शनवर नववर्षाच्या पार्टीत पोलिसांची सुरक्षा व्यवस्था असतानाही काही महिलांचा विनयभंग करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. या घटनेनंतर कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी वादग्रस्त विधान केले होते. ‘हे चांगले नाही. असा प्रकार पुन्हा होणार नाही. असे कार्यक्रम- समारंभ कशा पद्धतीने पार पाडावेत, याचा विचार करायला हवा. आपल्याकडे दहा हजार पोलिस नाहीत’, असे ते म्हणाले होते. तसेच पार्टीसाठी आलेल्या तरुण-तरुणींनी पाश्चात्यांचे अनुकरण केले होते. केवळ विचारांचेच नव्हे, तर पोषाखांचेही, असे वक्तव्य करून त्यांनी वाद ओढवून घेतला होता.

परमेश्वर यांच्या वादग्रस्त विधानानंतर समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांनीही वाद ओढवून घेतला आहे. आताच्या मॉर्डन जमान्यात महिला जितकी नग्न दिसते, तितकीच ती फॅशनेबल आहे, असे म्हटले जाते. माझी बहिण किंवा मुलगी सूर्य मावळल्यानंतर गैरपुरुषासोबत ३१ डिसेंबरला बाहेर पडते. त्यावेळी तिच्यासोबत भाऊ किंवा पती नसतो. हे बरोबर नाही, असे अबु आझमी म्हणाले. पेट्रोलच्या संपर्कात आग आली तर आग भडकेलच, साखर पडेल तिथे मुंग्या येणारच, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले. या विधानानंतर अनेक लोक नाराजी व्यक्त करतील, पण हे वास्तव आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. भारतीय संस्कृतीचे आचरण करा. आपल्या कुटुंबीयांसोबतच घराबाहेर पडा, असा सल्लाही त्यांनी महिलांना दिला.