भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे आयुक्त अच्युत हांगे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती बुधवारी वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाल्याने सरकारने त्याची गांभीर्याने दखल घेतली असून, आयुक्तांकडून खुलासा मागविण्यात येणार आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणी जाहिरातबाजी करू नये, असे संकेत आहेत. भिवंडी आयुक्तांच्या वाढदिवसानिमित्त काही वृत्तपत्रांमधून त्यांना शुभेच्छा देणाऱ्या जाहिराती बुधवारी प्रसिद्ध झाल्या. एक शुभेच्छुक तर रेल्वेचा ठेकेदार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
ठेकेदाराच आयुक्तांना वाढदिवसानिमित्त जाहिराती देऊन शुभेच्छा देतो हे प्रकरण तर फारच गंभीर आहे. भिवंडीमध्ये शासकीय अधिकारी राजकीय नेते झाल्याचा पूर्वइतिहास आहे. भिवंडी नगरपालिका असताना मुख्याधिकारी पदावर असलेले जयंत सूर्यराव नंतर नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. जे. जे. हत्याकांडातील सहभागावरून सूर्यराव यांना ‘टाडा’न्वये अटक होऊन त्यांना कारावासही भोगावा लागला
होता.
भिवंडी पालिका आयुक्तांना शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींबाबत नगरविकास खात्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्याची नगरविकास खात्याचे सचिव श्रीकांत सिंग यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या जाहिराती आयुक्तांच्या संमतीने प्रसिद्ध झाल्या, की याबाबत ते अनभिज्ञ होते, याबाबत त्यांच्याकडेच विचारणा करण्यात येणार
आहे.