मेळावा आटोपल्यावर कार्यक्रम स्थळी; मुंबापुरीत पर्यटनाचा आनंद

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याला येथून गेलेल्या हजारो कार्यकर्त्यांना गाडीचा मार्ग बदलल्यामुळे मेळाव्याला पोहोचता आले नाही. गुरुवारी निघालेली गाडी शुक्रवारी दुपारी सुरतमार्गे मुंबईत पोहोचली. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी रेल्वेस्थानकावरून कार्यक्रमस्थळी न जाता मुंबईमध्ये फिरण्याचा आनंद घेतला, तर काही कार्यक्रम आटोपल्यावर कार्यक्रम स्थळी पोहोचले.

महामेळाव्याला जाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात कार्यकर्ते खासगी गाडय़ाने गुरुवारी मुंबईला रवाना झाले होते. पक्षाच्यावतीने नागपूरवरून चार विशेष रेल्वे गाडय़ाची व्यवस्था करण्यात आली होती.  रेल्वे विभागाच्या गलथान कारभारामुळे गुरुवारी सकाळी १० वाजता निघणारी गाडी सकाळी ८.५० वाजता १७  प्रवाशांना घेत सोडण्यात आली. त्यामुळे हजारो कार्यकर्त्यांना पाच ते सहा तास गाडीची प्रतीक्षा करावी लागल्यानंतर दुपारी ३.३० वाजता विशेष गाडी नागपूरवरून निघाली. एरवी १२ ते १३ तासात मुंबईला पोहोचणारी गाडी भुसावळ, नंदूरबार मार्गे सुरतवरून नेण्यात आली. सकाळी १० वाजता पोहोचणारी गाडी दुपारी १.३० वाजता बांद्रा स्थानकावर पोहोचली. मात्र, तोपर्यंत महामेळाव्यात नेत्यांची भाषणे होऊन कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात होता. त्यामुळे नागपूरवरून गेलेल्या कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळी पोहोचता न आल्यामुळे  नाराजी व्यक्त केली.

रेल्वेवर खापर

दक्षिण-पश्चिमचे पक्षाचे कार्यकर्ते विवेक जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, पक्षाने कार्यकर्त्यांना घेऊन जाण्याची नीट व्यवस्था केली असली तरी रेल्वेच्या चुकीमुळे कार्यक्रमाला पोहोचता आले नाही. शिवाय नागपूरवरून गाडी निघाल्यानंतर प्रत्येक स्थानकावर गाडी थांबवली जात होती. मुंबईला सकाळी १० वाजता पोहोचेल असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यावेळी गाडी सुरतला पोहोचली नव्हती. मार्ग बदलल्यामुळे आधीच उकाडय़ाने हैराण झालेल्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांची प्रकृती बिघडली होती. पक्षातर्फे सकाळी रेल्वेस्थानकावर कुठलीही न्याहारीची व्यवस्था करण्यात आली नव्हती. पिण्याचे पाणी मात्र भरपूर होते.