scorecardresearch

प्रजन्या कदम आणि राजस लिमये पहिल्या ‘ब्लॉगबेंचर्स’चे मानकरी

विद्यार्थ्यांनी या अग्रलेखावर ५०० ते ७०० शब्दांत आपली भूमिका मांडायची होती.

blogbenchers, Loksatta, blog
आपल्या मनमोकळ्या आणि संयत भूमिकेने प्रजन्या आणि राजस यांनी परीक्षकांचे मन जिंकले.

नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येला लिहिलेल्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या अग्रलेखावर व्यक्त होण्याची संधी ‘ब्लॉगबेंचर्स’ने विद्यार्थ्यांना दिली होती. विद्यार्थ्यांनी या अग्रलेखावर ५०० ते ७०० शब्दांत आपली भूमिका मांडायची होती. त्यात आपल्या मनमोकळ्या आणि संयत भूमिकेने प्रजन्या आणि राजस यांनी परीक्षकांचे मन जिंकले.
स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास संपर्क loksatta.blogbenchers@expressindia.com

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आर्थिक घडोमोडींच्या पाश्र्वभूमीवर भविष्यातील भारताच्या ‘तेजोमय’ विकासाची अपेक्षा व्यक्त करणाऱ्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या ‘लोकसत्ता’ अग्रलेखावर तितक्याच ताकदीने भूमिका मांडणारी कराडची प्रजन्या महादेव कदम ही ‘ब्लॉगबेंचर्स’ची प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाची मानकरी ठरली आहे. तर पुण्याचा राजस सुरेश लिमये याने दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसावर आपले नाव कोरले आहे.
प्रजन्या कराडच्या ‘सरकारी तंत्रनिकेतन’ची विद्यार्थिनी आहे, तर राजस पुण्याच्या ‘एस. पी. महाविद्यालया’त शिकतो. हे दोघेजण अनुक्रमे सात आणि पाच हजार रुपये आणि प्रमाणपत्र या पारितोषिकांचे मानकरी ठरले आहेत. या दोघांना त्यांच्या त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते पारितोषिके वितरित केली जाणार आहेत.
वैचारिक निबंध लेखन हा खास महाराष्ट्राचा वारसा. ही परंपरा निर्माण करण्यात महादेव गोविंद रानडे, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा जोतिबा फुले, लोकहितवादी आदी विचारवंतांचा मोठा वाटा होता. महाराष्ट्राची वैचरिक निबंध लेखनकलेची हीच परंपरा जोपासण्याच्या उद्देशाने ‘लोकसत्ता’ने दोन आठवडय़ांपूर्वी ‘ब्लॉगबेंचर्स’चे दरवाजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खुले केले.
या लेखन स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर होणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. पहिल्याच लेखापासून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेला उदंड प्रतिसाद देत या उपक्रमाचे स्वागत केले. त्यांच्या निर्भीड लेखणीला वाट करून देणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विद्यापीठांची व महाविद्यालयांचीही मोलाची साथ आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते.
नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना यूजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉगइन करून विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-01-2016 at 12:14 IST