रुग्णसंख्येसह नियोजित शस्त्रक्रिया सुरू झाल्यामुळे रक्ताच्या मागणीत वाढ
मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर आता नियमित शस्त्रक्रियांसह सर्व आरोग्य सेवा सुरू झाल्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये रक्ताची मागणी वाढली आहे. सध्या रक्ताचा साठा उपलब्ध असला तरी मे महिन्यामध्ये मात्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यासाठी आधीच नियोजन करण्याची गरज असल्याचे व्यक्त केले जात आहे.
मे महिन्यामध्ये बहुतांश नागरिक सुट्टीवर जात असल्यामुळे रक्तदान शिबिरे होत नाहीत. तसेच महाविद्यालयेही या काळात बंद असल्यामुळे दात्यांची संख्याही कमी होते. त्यामुळे दरवर्षी या कालावधीत रक्ताचा तुटवडा जाणवतो. करोनाकाळात नियमित शस्त्रक्रियांसह अनेक सेवा पूर्णपणे सुरू नव्हत्या. करोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे रुग्णालयांनी या सेवा सुरू केल्या असून आता रुग्णही मोठय़ा संख्येने रुग्णालयात येऊ लागले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये रक्ताची मागणी वाढली असून रक्ताची आवश्यकता असल्याचे दूरध्वनी पुन्हा यायला सुरुवात झाली आहे. मे महिन्यात मोठय़ा प्रमाणात रक्ताची चणचण भासू शकते, असे थिंक फाऊंडेशनचे विनय शेट्टी यांनी सांगितले.
थॅलेसेमियाच्या बालकांना गेल्या तीन ते चार महिन्यांत रक्ताचा तुटवडा फारसा जाणवलेला नाही. परंतु आता रक्तपेढय़ांमध्ये इतर रुग्णांसाठीचीही मागणी वाढत असल्यामुळे या बालकांना इथून पुढे येताना दाता घेऊन येण्याच्या सूचना रुग्णालयांनी केल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा या मुलांसाठी रक्त मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली आहे, असे थॅलेसेमिया बालकांसाठी काम करणाऱ्या किशोर सातपुते यांनी सांगितले.
रुग्णसंख्या वाढल्यामुळे रक्ताची मागणीही वाढली आहे. सध्या पुरेसा साठा आहे. मात्र, मे महिन्यात रक्ताचा साठा उपलब्ध करण्यासाठी आतापासूनच तयारी करणे आवश्यक आहे. अन्यथा रुग्णांना पुन्हा धावाधाव करण्याची वेळ येईल, असे केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
कॉर्पोरेट कंपन्यांमधील शिबिरांवर भर देणे आवश्यक
कॉर्पोरेट कंपन्यांची कार्यालये पुन्हा सुरू झाली आहेत. या कंपन्यांमध्ये शिबिरांच्या आयोजनावर भर द्यायला हवा. आतापासूनच याची तयारी केली तर मे महिन्यात रक्ताचा तुटवडा भासणार नाही, असे शेट्टी यांनी सांगितले.
शिबिरांच्या नियोजनात समन्वय गरजेचा
१ मे या महाराष्ट्र दिनानिमित्ताने अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. परंतु शिबिरांच्या आयोजनामध्ये अनेकदा समन्वय नसतो. एकाच वेळी अनेक ठिकाणी शिबिर आयोजित करून भरमसाट प्रमाणात रक्ताचा साठा केला जातो. परंतु तेवढी मागणी नसल्यामुळे या रक्ताचा वेळेत वापर होत नाही. त्यामुळे नियोजनामध्ये समन्वय ठेवून एकाच वेळी अनेक शिबिरांचे आयोजन न करता टप्प्याटप्प्याने ती आयोजित केल्यास आवश्यकतेनुसार रक्त उपलब्ध होऊ शकेल. तसेच शिबिरांचे आयोजन करताना रक्तसाठा नसलेल्या रक्तपेढय़ांना त्यात सहभागी करून घेण्याची गरज आहे. जेणेकरून रक्ताचा विनियोग योग्य रीतीने केला जाईल, असे मत सातपुते यांनी व्यक्त केले.