गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सगळीकडे लगबग सुरु आहे. मात्र गणेशोत्सव तोंडावर असतानाच महापालिकेने गणेश मंडळांना धक्का दिला आहे. २८१ गणेश मंडळांना महापालिकेने मंडपासाठी परवानगी नाकारली आहे. विविध तांत्रिक कारणांमुळे पालिकेने परवानगी देण्यास नकार दिला आहे. दरम्यान ऑनलाइन प्रक्रियेमुळे हा गोंधळ झाला असल्याचं बोललं जात आहे.

सण, उत्सवांदरम्यान रस्त्यावर एकही बेकायदा मंडप उभारू देऊ नका, असा महत्वपूर्ण निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाला दिला होता. अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा येईल अशा पद्धतीने मंडप उभारले जातात. त्यामुळे रूग्णवाहिका किंवा अत्यावश्यक वेळी याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, असे मत न्यायालयाने नोंदवले होते. रस्त्यावर जर बेकायदा मंडप उभारला तर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने दिला होता.

दरवर्षी मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. अनेक मंडळे रस्ते, पदपथावर मंडप उभारत असल्यामुळे पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. या प्रकाराची गंभीर दखल घेत न्यायालयाने वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या मंडपांना परवानगी देऊ नये असे आदेश पालिकेला दिले. तसेच अडथळा करणारे मंडप उभे राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येतील, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासाठी रस्त्यांवर करण्यात येणाऱ्या मंडप उभारणीबाबत पालिका गंभीर आहे. पालिकेने यंदा प्रथमच मंडळांना मंडपासाठी ऑनलाइन पद्धतीने परवानगी देण्याचा निर्णय घेत अर्ज मागविले होते. मुंबईतील तब्बल दोन हजार ६९४ मंडळांनी मंडप परवानगीसाठी पालिकेकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. यापैकी काही मंडळांनी एकापेक्षा अधिक वेळा अर्ज सादर केले आहेत. असे ५९४ अर्ज पालिकेने बाद केले आहेत. उर्वरित दोन हजार १०० पैकी एक हजार ४२५ म्हणजे ६७ टक्के मंडळांना मंडप उभारण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गणेशोत्सवावरुन सुरु असलेल्या वादावर पोस्टरबाजी करत शिवेसनेवर हल्लाबोल केला होता. अयोध्येला जाऊन श्रीराम मंदिर जरुर बांधा, पण त्याआधी मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडप बांधा असा टोला मनसेने होता. शिवसेना भवनसमोर हे पोस्टर लावण्यात आलं होतं. दरम्यान याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रत्येक वेळी हिंदूंच्याच सणांना का आडकाठी केली जाते, असा सवाल विचारत गणेश मंडळांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही बिनधास्त साग्रसंगीत गणेशोत्सव साजरा करावा असं सांगितलं होतं.

गणेशोत्सव आवडत नसेल त्यांनी खुशाल स्मशानात जावे – उद्धव ठाकरे</strong>
गणेशोत्सव हा धूमधडाक्यात साजरा केला पाहिजे. ज्यांना गणेशोत्सव आवडत नसेल त्यांनी खुशाल स्मशानात जाऊन बसावे, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केले होते. ध्वनी प्रदुषणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करुन गणेशोत्सवात विघ्न आणणाऱ्यांना मेट्रोच्या कामांमुळे होत असलेला खणखणाट ऐकून येत नाही का?, असा सवालही त्यांनी विचारला होता.