५०० चौरस फुटांपेक्षा कमी घरांना ७० टक्के देयक भरावे लागणार

मुंबई : पालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा शिवसेनेने केली होती. त्याची अंमलबजावणी करण्याचे पालिकेने ठरवले असून सर्वसाधारण कर वगळून मालमत्ता कराची बिले लवकरच करदात्यांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना संपूर्ण करमाफी मिळणार नाहीच हे आता स्पष्ट झाले आहे. ५०० चौरस फुटांपर्यंतचे घर असलेल्यांना ७० टक्के बिल भरावेच लागणार आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सर्वात प्रथम १४ मार्चला दिले होते.

पालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेनेने ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी देण्याचे वचन दिले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने त्याबाबतची अधिसूचना जारी केली. अधिसूचनेनुसार मालमत्ता कराच्या देयकातील फक्त सर्वसाधारण कर माफ केला. त्यामुळे संपूर्ण करमाफी करायची की केवळ सर्वसाधारण कर माफ करायचा याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. करदात्यांना देयके तरी कशी द्यायची, असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला होता. व्यावसायिक आणि मोठय़ा करदात्यांना मालमत्ता कराची सहामाही देयके पाठविण्यात आली आहेत.  मात्र ५०० चौरस फुटांचे घर असलेल्या मुंबईकरांना अद्याप देयके देण्यात आली नव्हती. मात्र आता केवळ सर्वसाधारण कर वगळून देयके देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

मालमत्ता कराची देयके वर्षांतून दोनदा येतात. पहिल्या सहा महिन्यांचे देयक जुलैपर्यंत पाठवावे लागते. मात्र ५०० चौरस फुटांपर्यंतचे घर असलेल्यांना ऑगस्ट महिना उजाडला तरी ती वितरित झालेली नाहीत. ही देयके लवकरच दिली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अधिसूचनेनुसार मालमत्ता कराच्या देयकातील सर्वसाधारण कर माफ केला जाणार आहे. मात्र पालिकेला दिले जाणारे उर्वरित नऊ कर मुंबईकरांना भरावेच लागणार आहेत. सर्वसाधारण कर हा मालमत्ता कराच्या एकूण देयकाच्या केवळ ३० टक्केच असतो. त्यामुळे रहिवाशांना मालमत्ता कराच्या देयकातील ७० टक्के रक्कम भरावीच लागणार आहे.

रक्कम कोणती?

मालमत्ता कराचे देयक देताना त्यात पालिकेकडून विविध प्रकारचे दहा कर आकारले जातात. त्यापैकी फक्त सर्वसाधारण कर माफ करण्यात आला आहे. मात्र अन्य नऊ  कर मुंबईकरांना भरावेच लागणार आहे. पालिका मुंबईकरांना ज्या सेवा-सुविधा देते, त्याकरिता हे कर आकारले जातात. मालमत्ता करानुसार ते ठरतात. यापैकी रोजगार हमी आणि राज्य शिक्षण कर राज्य सरकारला दिला जातो. तर हा कर गोळा केल्याबद्दल २ टक्के निधी पालिकेला मिळतो.

दहा कर कोणते?

’ सर्वसाधारण कर – ०.११० (वगळण्यात आला आहे)

’ पाणीपट्टी कर – ०.२५३

’ जललाभ कर – ०.०६९

’ मलनिस्सारण कर – ०.१६३

’ मलनिस्सारण लाभ कर  – ०.०४३

’ महापालिका शिक्षण उपकर – ०.०४०

’ राज्य शिक्षण कर – ०.०३५

’ रोजगार हमी कर – ००

’ वृक्ष कर – ०.००२

’ पथकर – ०.०५०

 

१८,२१,०००

पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या एकूण मालमत्ता

३७८ कोटी 

पाचशे चौरस फुटांच्या घरांच्या मालमत्ता करातून मिळणारे उत्पन्न

१००-१२० कोटी

केवळ सर्वसाधारण कर माफ केल्यास तिजोरीवर येणारा बोजा