मुंबई : वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आलेल्या दोन तरुणींना नातेवाईकांकडे न सोपवता सुधारगृहातच ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या तरुणींना सुधारगृहातून सोडण्यात आल्यास पुन्हा त्या या व्यवसायाकडे वळू शकतात, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्यांची सुधारगृहातून सुटका करण्यास नकार दिला.

त्यांच्या नातेवाईकांनी न्यायालयात धाव घेतली होती. पीडित तरुणीला सात वर्षांची मुलगी आहे. तिचा सांभाळ करण्यासाठी या तरुणीची सुटका करण्याची मागणी तिच्या बहिणीने केली होती. तर दुसऱ्या तरुणीची सुधारगृहातून सुटका करण्यात आली नाही, तर तिला खासगी कंपनीतील नोकरी गमवावी लागेल, असा दावा या तरुणीच्या बहिणीने केला होता. शिवाय दोन्ही तरुणी सज्ञान असल्याने निर्णय घेण्यास त्या स्वतंत्र आहेत, असा दावाही करण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयाने दोन्ही पीडित तरुणींना सुधारगृहात पाठवताना त्यांची कौटुंबिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यातून पुढे आलेल्या माहितीतून या दोन्ही तरुणींची सुधारगृहातून सुटका केल्यास त्या पुन्हा वेश्याव्यवसायाकडे ओढल्या जातील, असे निदर्शनास आले होते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून कनिष्ठ न्यायालयाने दोन्ही तरुणींच्या नातेवाईकांच्या याचिका फेटाळून लावत त्यांची सुधारगृहातून सुटका करण्यास नकार दिला.