मुंबई : शहरी नक्षलवाद प्रकरणातील आरोपी ८३ वर्षांचे तेलुगु लेखक-कवी वरवरा राव यांची कायमस्वरूपी वैद्यकीय जामिनाची मागणी उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. मात्र त्याच वेळी राव यांना मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करता यावी यासाठी न्यायालयाने त्यांच्या अंतरिम वैद्यकीय जामिनाची मुदत तीन आठवडय़ांनी वाढवली.

अंतरिम जामिनावर बाहेर असताना मुंबईतून हैदराबाद येथील घरी राहण्यास परवानगी देण्याची राव यांनी केलेली मागणीही न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती जी. ए. सानप यांच्या खंडपीठाने बुधवारी फेटाळली. त्याच वेळी विशेष न्यायालयाने शहरी नक्षलवाद प्रकरणाशी संबंधित खटला जलदगतीने पूर्ण करण्याचे आणि खटल्याची सुनावणी दररोज घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

कारागृहांतील वैद्यकीय सुविधांबाबतचा अहवाल द्या

तळोजा कारागृहात वैद्यकीय सुविधांचा अभाव आणि तेथील स्वच्छतेच्या अटींबाबत राव यांचे वकील आनंद ग्रोव्हर यांनी केलेल्या अनेक दाव्यांमध्ये तथ्य असल्याचेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. तसेच राज्यभरातील सर्व कारागृहातील विशेषत: तळोजा कारागृहातील वैद्यकीय सुविधांच्या स्थितीबाबत अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने या वेळी राज्याच्या कारागृह महानिरीक्षकांना या वेळी दिले. हा अहवाल ३० एप्रिलपर्यंत सादर करण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.